गिरीश भोपी,पनवेल :
आपण पोलीस आहोत असे बतावणी करून दोन वेगवेगळ्या घटनेत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना कळंबोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. १८ मार्च रोजी बुलेटवरून आलेल्या दोघा इसमांनी तैबुर बासीद अली (वय ३० वर्षे) व शहाजहान अली यांच्याकडून पोलीस असल्याचे सांगून त्यांची पर्स घेतली व तुम्ही ओळखपत्र दाखवून तुमची पर्स न्या असे सांगितले होते. त्यानंतर दोघेही ओळखपत्र घेवुन पुन्हा कळंबोली सर्कल येथे आले असता ते दोघे परत आले नाहीत. या पर्समध्ये ५ हजार ४०० रुपये व हजेरी कार्ड होते. तर दुसऱ्या घटनेत गुलाबराव अभिमान पाटील (वय ४२ वर्षे), यांच्याकडील लायसन्स पोलीस असल्याचे सांगून दोघेही घेऊन गेले होते. याबाबतचे गुन्हे दाखल होताच कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड व त्यांच्या पथकाने तपास करून आकारामजयराम आलदर (३८, कळंबोली) व दशरथ शहाजी जाधव (३०, कळंबोली) या आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लायसन्स, ५ हजार रुपये व ओळखपत्र हस्तगत करण्यात आले आहे.