सीमामावर्ती भागातील कायदा व सुव्यवस्थेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

753

शैलेंद्र चौधरी नंदुरबार,

लोकसभा सार्वत्रिक निवडणूका सुरळीतरीत्या व शांततेच्या वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागातील कायदा व सुव्यवस्था आणि अवैध मद्य वाहतूक रोखण्याविषयी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी घेतला.गुन्हेगारांवर वचक बसावा आणि त्यासंदर्भात आवश्यक कारवाई तात्काळ व्हावी दोन्ही राज्यातील सीमावर्ती भागात चेक पोस्टावर काम करणाऱ्या यंत्रणांनी एकमेकांच्या संपर्कात राहून समन्वयाने काम करावे,अशा सुचना श्री. मंजुळे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित संयुक्त आढावा बैठकीत ते बोलत होते.बैठकीस नर्मदा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आय. के. पटेल,अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे,जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील, तळोदयाचे सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, नंदुरबार वान्मती सी,निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार,अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक मोहन वर्दे, प्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव,राजपिंपळाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र परमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मंजुळे म्हणाले,लोकसभा निवडणूक कालावधीत सीमावर्ती भागातील सर्व चेक पोस्ट,पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून काम करावे.निवडणूक कालावधीत अवैध मद्य वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जागोजागी तपासणी करावी.यासाठी उत्पादन शुल्क विभागाने पोलीस विभागाच्या समन्वयाने संयुक्त मोहिम राबवावी,
नर्मदा नदी किनाऱ्यावर अवैध मद्य वाहतुक व गुन्हेगारी रोखण्यासाठी 16 किलोमीटर परिसरात पोलीस विभागाने गस्त वाढवावी,उत्पादन शुल्क व प्रादेशिक परिवहन विभागामार्फत वाहनांची मोठ्या प्रमाणात तपासणी केली जावी,अशासुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.
पोलीस अधिक्षक पाटील म्हणाले,नंदुरबार लोकसभा मतदार संघ धुळे जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघासह सहा विधानसभा मतदार संघ येतात.नंदुरबार जिल्हा जरी लहान असला तरी जिल्हयाची सीमा तीन राज्यांशी जोडली जाते. यामुळे तीनही राज्यातील सिमावर्ती भागातील चेक पोस्टावर नजर ठेवावी लागते.सीमावर्ती भागातून अवैध मद्य घेवून जाणे,गुन्हेगारांना पळण्याची संधी मिळू नये यासाठी या भागातील सर्व चेक पोस्टावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष दक्षता बाळगावी.
महाराष्ट्रातील काही फरार गुन्हेगार गुजरात राज्यात तर गुजरात राज्यातील काही फरार गुन्हेगार महाराष्ट्रात असण्याची शक्यता लक्षात घेता दोन्ही राज्यातील फरार आरोपींना शोधण्यासाठी दोन्ही राज्यातील पोलीस विभागामार्फत संयुक्त मोहिम राबविण्यात येईल. गुजरात राज्यात दारुबंदी असल्यामुळे पंजाब व हरियाना या राज्यातून मोठ्या प्रमाणात अवैध मद्य वाहतुक ही महाराष्ट्र राज्यातून केली जात असल्यामुळे महाराष्ट्र व गुजरातच्या उत्पादन शुल्क विभाग,प्रादेशिक परिवहन व पोलीस विभागाने एकमेकांच्या कायम संपर्कात राहीले तर निश्चित अवैध मद्य वाहतुकीसह गुन्हेगारांवरही वचक बसेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र व गुजरात सीमावर्ती भागातील कार्यान्वीत असलेल्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती देण्यात आली.