मल्हार न्यूज नेटवर्क :- तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर :
पत्नी आपल्या दोन चिमुकल्या मुलींना तसेच पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली. यामुळे तणावग्रस्त पतीने दोन चिमुकल्या मुलींना गळफास लावून नंतर स्वतःही गळफास घेवून आत्महत्या केली. विशेष म्हणजे मुलींचा गळफास लावलेला फोटो त्याने पत्नीच्या व्हाट्सॲपवरसुध्दा टाकला. सदर घटना रात्री १ वाजताच्या सुमारास घडली.
रूषीकांत कडूपले (४०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याने पाच वर्षीय नारायणी आणि दोन वर्षीय कार्तिकी या मुलींची सुध्दा हत्या केली.
प्राप्त माहितीनुसार रूषीकांत हा आपली पत्नी व दोन मुलींसह शहरातील विवेकानंद वार्डातील जय भिम चौक परिसरात राहत होता. पत्नी प्रगती (३२) हिचे एका वाहनचालकासोबत प्रेमसंबंध होते. तिने आपला पती आणि दोन मुलींना सोडून आठ दिवसांपूर्वी प्रियकरासोबत पलायन केले. तिला कुटुंबीयांनी समजाविण्याचा प्रयत्न केला. घरी येण्याची विनंतर केली. मात्र ती ऐकायला तयार नव्हती. त्याने पत्नी पळून गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यातसुध्दा केली होती. काल १ एप्रिल च्या रात्री १२ ते १ वाजताच्रूा दरम्यान रूषीकांत ने पाच वर्षीय मोठ्या मुलीला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावला. यानंतर दोन वर्षांच्या लहान मुलीला गळफास लावला. तिची हत्या केल्यानंतर आपल्या पत्नीला फोटो काढून व्हाट्सॲप केला. प्रगती ने याबाबत आपल्या वरोरा येथे वास्तव्यास असलेल्या वडीलांना माहिती दिली. प्रगतीच्या वडीलांनी रूषीकांतच्या भावासोबत संपर्क साधला. भावाच्या परीवाराने दार ठोठावला. मात्र कोणताही प्रतिसादर मिळाला नाही. घटनेची माहिती नागरीकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. दरवाजा तोडून आत बघितल्यानंतर आतील दृश्य अत्यंत ह्रदयद्रावक होते. तिघेही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये गळफास लावलेल्या स्थितीत होते.
रूषीकांत कडूपले हा खुटेमाटे आयटीआय मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता. पत्नी प्रगती एका वाहन चालकाच्या प्रेमात पडली होती आणि तिच्या टोकाच्या निर्णयामुळे रूषीकांत खचला होता. यामुळे त्याने आपल्या मुलींसह आत्महत्या केली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ होत असून दोन्ही परिवारांनी प्रगतीवर कठोर कारवाई करावी याकरीता रात्री २ वाजतापासून पोलिस ठाण्यात उपस्थित झाले होते. पुढील तपास बल्लारपूर पोलिस करीत आहेत.