जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान जनजागृतीचा शुभारंभ

772

मतदारांना जागृत करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राज्यात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या रिजनल आऊटरिच ब्यूरोव्दारे महा मतदार जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नवी दिल्लीचे ब्यूरो ऑफ आऊटरीच कम्यूनिकेशनचे महासंचालक सत्येंद्र प्रकाश यांनी दिली.

            पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार जनजागृती मोहिमेंतर्गत फिरते चित्रवाहन व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पत्र सूचना कार्यालय व रिजनल आऊटरिच ब्यूरोचे अतिरिक्त महासंचालक डी.जे.नारायण, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग,  पुणे रिजनल आऊटरिच ब्यूरोचे  संचालक संतोष अजमेरा, स्वीपचे समन्वयक सुभाष बोरकर, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक महेश अय्यंगार, सहाय्यक संचालक भारत देवमनी, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, व्यवस्थापक जितेंद्र पानपाटील, प्रशासकीय अधिकारी सुनिल डहाके आदी मान्यवर उपस्थित होते.        जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्‍हणाले की, पुणे जिल्हयात स्वीप उपक्रमांतर्गत मतदान जनजागृती काम नियोजनबध्द पध्दतीने चालू असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ७० टक्याहून अधिक मतदान व्हावे यासाठी विविध माध्यमाचा वापर केला जात आहे असे सांगून रिजनल आऊटरिज ब्यूरो व्दारे हाती घेण्यात आलेल्या मोहिमेव्दारे मतदानाची टक्केवारी वाढवण्यास नक्कीच मदत हाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

            या कार्यक्रमाचा शुभारंभ महासंचालक सत्येंद्र प्रकाश व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी फित कापून व हवेत फुगे सोडून केला. राज्यातील जिल्हयांमध्ये या जनजागृती मोहिमेस प्रारंभ झाला असून  सांस्कृतिक कार्यक्रम, नाटीका, संगीत अशा वेगवेगळया कार्यक्रमांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.