लाच स्वीकारताना महिला तलाठ्यास रंगेहात अटक

791

अनिल चौधरी:-

खरेदी केलेल्या शेतजमिनीचे ७/१२ उताऱ्यावर तक्रारदारांचे नाव लावण्यासाठी मध्यस्थामार्फत  ५००० हजार रुपये लाचेची मागणी करून ३००० हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या महिला तलाठी भाग्यश्री रावसाहेब धायतडक तलाठी मुंडेगाव, घोटी, इगतपुरी नाशिक आणि हिरामण गंगाराम खोकले खाजगी इसम रा. सोनज, पो.वाघेरे, ता.इगतपुरी नाशिक यांना नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून अटक करण्यात आली आहे.

  याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विश्वजीत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांनी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात शेतजमीन खरेदी केली होती. सदर शेतजमिनीची ७/१२ उताऱ्यावर त्यांचे नाव लावण्यासाठी तक्रारदार यांनी तलाठी कार्यालय, मुंडेगाव, घोटी येथे अर्ज केला होता. पण त्यांचे नाव काही ७/१२ उताऱ्यावर लागत नव्हते. याबाबत त्यांनी तलाठी भाग्यश्री रावसाहेब धायतडक यांना भेटले असता सदर कामाकरीता ५००० हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार व तलाठी भाग्यश्री धायतडक यांच्यात तडजोडी अंती ३००० हजार रुपये लाच देण्याचे ठरले. लाच दिल्याशिवाय आपले काम होणार नाही आणि लाच देण्याची तक्रारदार यांची इच्छा नसल्याने त्यांनी त्वरित लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली. दिलेल्या तक्रारीची एसीबी नाशिक विभागाने खात्री केली असता त्यात तथ्य असल्याचे जाणवल्याने एसीबी नाशिक विभागाने मुंडेगाव घोटी येथील तलाठी कार्यालयात सापळा लावला. तक्रारदार यांच्याकडून मध्यस्थ हिरामण खोकले यांच्यामार्फत लाच स्वीकारताना महिला तलाठी भाग्यश्री धायतडक यांना तलाठी कार्यालयात रंगेहात पकडून त्यांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस करत आहेत.