अनिल चौधरी:-
जगदीश संभाजी दळवी या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास (तत्कालीन नेमणूक साकीनाका पोलीस ठाणे) यांनी लाचेची मागणी करून लाच स्वीकारल्याचे मान्य केल्या प्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने ४ वर्षांचा साधा कारावास व ५००० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आली.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सहा.पो.उप. निरीक्षक जगदीश दळवी हे साकीनाका पोलीस ठाणे कार्यरत असताना फिर्यादी यांच्या विरुद्ध साकीनाका पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्याचे दोशारोष पत्र कमकुवत करण्यासाठी रुपये २,२५,००० /- लाच म्हणून स्वीकारले आणि तडीपारीची कारवाई थांबविण्यासाठी रुपये ५०,०००/ हजार लाचेची मागणी करून तडजोडी अंती २५,०००/- लाच स्वीकारण्याचे मान्य केले म्हणून लाच लुचपत प्रतिबंधक मुंबई विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या तपास पूर्ण करून मा.विशेष न्यायालयात आरोपी जगदीश दळवी यांच्या विरुद्ध विशेष खटला क्रं. ७३/२०१४ अन्वये दोषारोप पत्र सादर करण्यात आले होते.या खटल्याची सुनावणी मा.विशेष सत्र न्यायालय, कोर्ट क्रं.४५ येथे झाली असता , सुनावणी अंती लोकसेवक आरोपी विरुद्ध आरोप सबळ पुराव्यानिशी सिद्ध झाल्याने दि. ३ एप्रिल २०१९ मा.न्यायालयाने आरोपीस कलम -७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मध्ये ३ वर्षे साधा कारावास व दंड रु.५००० रुपये दंड , दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास व कलम -१३(१)(ड) सह १३(२) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मध्ये ४ वर्षे साधा कारावास व दंड ५००० हजार रुपये दंड , दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास अशा शिक्षा सुनावण्यात आल्या.
सदर गुन्ह्याच्या तपास तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक सुखदा नारकर व पोलीस निरीक्षक एच.एन.जाधव यांनी केला. सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता जे.व्ही.देसाई यांनी काम पाहिले.