वॉटर कप’ महिला प्रशिक्षणात नंदुरबार प्रथम

845

श्रमदानात सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

शैलेंद्र चौधरी,नंदुरबार

गावातील दुष्काळ दूर करण्यासाठी जिल्ह्यातील 173 गावे सत्यमेव जयते ‘वॉटर कप’ स्पर्धेत सहभागी झाली असून स्पर्धेसाठी आयोजित महिला प्रशिक्षणात नंदुरबार तालुका राज्यात अग्रेसर ठरला आहे. नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी 7 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या श्रमदानात सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी केले आहे.
राज्यातील एकूण 24 जिल्ह्यात 76 तालुक्यातील 4 हजार 706 गावे या स्पर्धेत सहभागी झाली असून जिल्ह्यातील 173 गावांचा त्यात समावेश आहे. सर्वाधिक गावांच्या सहभागाबाबत चौथ्या क्रमांकावर आहे.नंदुरबार तालुक्यात 102 गावातील 261 पुरुष आणि 237 महिला तर शहादा तालुक्यात 71 गावातील 261 पुरुष आणि 93 महिला प्रशिक्षणात सहभागी झाल्या. प्रशिक्षणात उपस्थितीबाबतही जिल्हा अग्रेसर आहे.
या गावांमध्ये दि 7 एप्रिल रोजी रात्रीपासून कामांना सुरूवात होणार आहे. यातील बहुतेक गावांनी कामासाठी तयारी पुर्ण केली असून नागरीकात कामाबाबत उत्साह आहे. गावातील दुष्काळ दूर करण्याच्या उद्देशाने नागरीक एकोप्याने तयारीला लागले आहेत. प्रशिक्षणादरम्यान नागरिकांना चर खोदणे, विहिरीतील पाणी पातळी मोजणे,जलसंधारण आदीबाबत माहिती देण्यात आली आहे.
नागरिकांनी या स्पर्धेत उत्तम कामगिरी करून जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवून द्यावे आणि दुष्काळमुक्तीच्या प्रयत्नात प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी केले आहे. स्वयंसेवी संस्थांनीदेखील या कामात सहभागी होण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
नंदुरबार तालुक्यात 7 एप्रिल रोजी कामे सुरु करणारी गावे-वावत, तिशी,कारली,ढंढाने, मांजरे,बलदाने,कोठली खुर्द,अजेपुर,कोठडे, केसरपाडा,शिवपूर, पथराई, लोय,जळखे, धमडाई,नगाव.
शहादा तालुक्यात 7 एप्रिल रोजी कामे सुरू करणारी गावे- मानमोड्या,जयनगर, नवानगर,जाम,गोगापूर, काथरदे,खुर्द,अंबापूर, काहटूळ,लोंढरे, कोळपांढरी,कोठली त सा,कानडी त श(खुर्द), धांद्रे(खुर्द),कळंबु, हिंगणी,भुलाने.