‘कार्टूनिस्‍ट्स कंबाईन’चे 13 आणि 14 एप्रिलला नाशकात वार्षिक संमेलन

711

पुणे – ‘कार्टूनिस्‍ट्स कंबाईन’ हे अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकारांचे व्यासपीठ आहे. प्रसिध्द व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शि.द.फडणीस, मंगेश तेंडुलकर, वसंत हळबे, राम वाईरकर, संजय मिस्त्री, खलील खान या सारख्या महाराष्ट्रातील मान्यवर व्यंगचित्रकारांच्‍या उपस्थितीत व्यंगचित्रकलेच्‍या संवर्धनासाठी दादर येथे सेना भवनात या संस्‍थेची स्‍थापन केली.

विनोद, व्यंगचित्रे, हास्यचित्रे यांची आवड नाही अशी व्यक्ती सापडणे कठीणच. हेच लक्षात घेऊन ‘कार्टूनिस्‍ट्स कंबाईन’ या संस्थेतर्फे व्यंगचित्रकलेच्‍या विकासासाठी व्यंगचित्रकारांचे संमेलन, व्यंगचित्र प्रदर्शन गेल्या काही वर्षांत पुण्‍यासह नांदेड,मुंबई, ठाणे, नागपूर तसेच महाराष्ट्र राज्यातील इतर शहरात आयोजित झालेले आहे.

दि. 13 व 14 एप्रिल 2019 रोजी नाशिकच्‍या कुसुमाग्रज प्रतिष्‍ठान येथे व्यंगचित्रकार संमेलन व व्यंगचित्र प्रदर्शन ‘हास्‍य मैफील’ या नावाने होणार असून यामध्‍ये देशभरातील 70 पेक्षा जास्त दिग्गज तसेच नवोदित व्यंगचित्रकार प्रत्यक्ष हजेरी लावणार आहेत. प्रदर्शनाच्या ठिकाणी सहभागी व्यंगचित्रकारांची प्रात्यक्षिके रसिकांना बघायला मिळतील. प्रदर्शनामध्‍ये ज्ञानेश सोनार, विकास सबनीस, प्रभाकर वाईरकर, प्रभाकर झळके, जगदीश कुंटे,रवींद्र बाळापुरे, महेंद्र भावसार, अतुल पुरंदरे, विश्‍वास सूर्यवंशी,लहू काळे, अनंत दराडे, भटू बागले, शरयू फरकंडे, वैशाली दांडेकर, अशोक सुतार, सुहास पालीमकर, निखिल मुळये,अनंत दराडे यांच्‍यासह मान्यवर व्यंगचित्रकारांच्या सुमारे 300व्यंगचित्रांचा समावेश आहे.

संमेलनाचे उद्घाटन माजी उपमुख्‍यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शनिवार दिनांक 13 एप्रिलला सकाळी  10.30 वा होईल व याचवेळी सुप्रसिध्द व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांना त्‍यांच्‍या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देण्यात येईल. कार्यक्रमात सोनार यांच्‍या पेंटीग्‍जचे कॉफी टेबलबुक  ‘डिफरंट स्‍ट्रोक्‍स’चे प्रकाशन केले जाणार आहे.  तसेच त्‍यांच्‍या कारकिर्दीवरील ध्‍वनी-चित्रफीत दाखविली जाणार आहे. कार्यक्रमा दरम्‍यान प्रा. डॉ. शंकर बोराडे हे सोनार यांची प्रकट मुलाखत घेतील.

दुपारच्‍या सत्रात प्रशांत कुलकर्णी हे ‘अद्भूत कल्‍पना’आणि त्‍यानंतर वैजनाथ दुलंगे  ‘सराव व्‍यंगचित्रांचा’ या कार्यक्रमाचे सादरीकरण करतील. तिस-या सत्रात ‘आपले व्यंगचित्र आपल्या समोर’ या कार्यक्रमात  रसिकांना आपले व्यंगचित्र काढून घेण्‍याची संधी मिळेल.

दि. 14 एप्रिलला सकाळी 10.30 वाजता व्‍यंगचित्रकलेच्‍या विविध शाखांतील तज्ञांचा परिसंवाद आयोजित करण्यात येणार असून नवोदित तसेच व्यंगचित्रकलेत, अॅनिमेशन क्षेत्रात काही करू पाहणाऱ्यांना

विकास सबनीस, विनय चानेकर, ज्ञानेश सोनार, चारूहास पंडित, घनश्‍याम देशमुख हे मार्गदर्शन करणार आहेत. सूत्रसंचालन राजीव गायकवाड व योगेंद्र भगत करतील. संमेलनात माजी कार्यकारणी अध्यक्ष विवेक मेहेत्रे व इतर सदस्‍यांचाही सत्कार करण्यात येणार असल्‍याचे कंबाईनचे अध्यक्ष संजय मिस्त्री यांनी कळविले आहे. रसिकांनी या सांस्कृतिक पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्टूनिस्‍टस् कंबाईनच्‍या कार्यकारिणीने केले आहे.

(अधिक माहितीसाठी संपर्क संजय मिस्‍त्री 9819523741  / रवींद्र बाळापुरे 7507329721 )