गिरीश भोपी ,पनवेल
खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत १५ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा २ किलो ९७० ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत खांदेश्वर पोलिसांनी आकाश साखरे (वय २० वर्षे) आणि कर्मवीर उर्फ बिटु सिंग (वय २६ वर्षे) या दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस उपनिरीक्षक संदीप माने व पोलीस नाईक सुमंत बांगर यांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळालेल्या बातमीवरुन खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत रविवारी (०७ एप्रिल) मध्यरात्री ३ ते ५ वाजताचे सुमारस भैरवनाथ मंदीराशेजारी, ग्रामपंचायत कार्यालयाजवळ दोन इसम अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याबाबतची खात्रीलायक बातमी मिळाली होती. त्यांनी संबंधित बातमीची वरीष्ठांना माहिती दिल्यानंतर वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खांदेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश मोरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप माने व पोलीस नाईक सुमंत बांगर, पोलीस शिपाई अमोल कोळी, महेश अहिरे यांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी आकाश बाबु साखरे (वय २० वर्षे) आणि कर्मवीर उर्फ बिटु रघुराज सिंग (वय २६ वर्षे) यांच्या ताब्यातील ०२ किलो ९७० ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ जप्त करून दोघांना अटक करण्यात आली. या अंमली पदार्थाची किंमत सुमारे १५,०५,००० एवढी आहे.
अटक करण्यात आलेल्या दोघांना बेकायदेशीरपणे अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एन.डी.पी.एस कायदा १९८५ च्या कलम ८(क) २० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पनवेल कोर्टाने पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप माने हे करीत आहेत