दिग्गजांच्या उपस्थितीत रंगला ७ वा ‘‘हॅवमोर आईसक्रीम मिर्ची म्युझिक अवॉर्ड’ चा सोहळा

1399

मल्हार न्यूज, प्रतिनिधी

वैविध्यपूर्ण गाण्यांच्या साथीने बहरलेला आणि संगीत, नृत्याच्या साथीने रंगलेला ‘हॅवमोर आईसक्रीम मिर्ची म्युझिक अवॉर्ड’ सोहळा पुण्याच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मोठ्या जल्लोषात पार पडला. मराठी चित्रपट संगीत क्षेत्राचा सन्मान करणारा हा एकमेव पुरस्कार सोहळा असल्याने संगीतप्रेमी याची आतुरतेने वाट बघत असतात. 2018 हे वर्ष मराठी संगीत क्षेत्रासाठी आश्वासक ठरले, या सोहळ्यात दिग्गजांचा गौरव करत मराठी संगीत क्षेत्राला मानाचा मुजरा करण्यात आला.

स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ जाधव या अभिनेता जोडीने ‘हॅवमोर आईसक्रीम मिर्ची म्युझिक अवॉर्ड’ या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक, मृण्मयी देशपांडे, दीप्ती देवी, सावनी रवींद्र, पर्ण पेठे इ. अभिनेत्रींच्या मनमोहक अदांनी सोहळ्याचे रेड कार्पेट उजळून निघाले. अभय जोधपुरकर यांच्या गीतांनी व सुरेल जादुई आवाजाने प्रेक्षकांना मोहित केले. तसेच सावनी रवींद्र, नेहा राजपाल, हृषीकेश कामेरकर आणि अंजली मराठे यांनी आपल्या कर्णमधुर आवाजाने रसिकांची मने जिंकली. ‘सूर नवा, ध्यास नवा’ या लोकप्रिय टी.व्ही. शो च्या महा-अंतिम फेरीतील गायकांनी आपल्या मधुर आवाजांनी या सोहळ्याला नवा साज चढवला.

पाश्चात्य आणि शास्त्रीय गायक जसराज जोशी यांनी आपल्या लोकप्रिय गाण्यांनी प्रेक्षकांना सोहळ्यात खिळवून ठेवले. उत्कृष्ट नृत्यांगना आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या बहारदार नृत्याने सोहळ्यात रंगत आली. मानसी नाईक आणि नकुल घाणेकर यांनी कथ्थक आणि लॅटिन जुग्लाबंदीने  कार्यक्रमात जान आणली. तसेच पुष्कर जोग आणि भार्गवी चिरमुले यांनी आपल्या  बहारदार नृत्यातून सचिन पिळगावकर यांना मानवंदना दिली. ज्येष्ठ गायक सुदेश भोसले यांनी आपल्या खास शैलीत गीते सादर करत रसिकांची मने जिंकली.

अविनाश ओक यांचे मराठी आणि हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ योगदान लक्षात घेता त्यांना ‘विशेष योगदान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला तसेच ज्येष्ठ गायक रवींद्र साठे यांना ज्येष्ठ गायक, संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक अजरामर कलाकृती देत पाच दशकाहून अधिक काळ रुपेरी पडदा गाजवणारे अभिनेते सचिन पिळगावकर यांना ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते  ‘फेस ऑफ आयकॉनिक हिट्स’ हा किताब देऊन सन्मानित करण्यात आले. ‘हॅवमोर आईसक्रीम मिर्ची म्युझिक अवॉर्ड’ सोहळ्याचे हे ७ वे वर्ष असून ग्लॅमर, कलाकारांची मांदियाळी, संगीताची सुरेल मेजवानी आणि संगीताशी निगडीत सर्व विभागांचा गौरव करण्यात आल्याने ‘हॅवमोर आईसक्रीम मिर्ची म्युझिक अवॉर्ड’ सोहळा वेगळा ठरला.