मल्हार न्यूज, प्रतिनिधी
उमेदवाराने निवडणूक प्रक्रियेदरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी निवडणुकीच्या अनुषंगाने खर्च केला असल्यास तो खर्चात दाखवावा तसेच प्रचारा दरम्यान होणारा खर्च वेळेवर सादर करावा,असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या बैठकीत ते बोलत होते. निवडणुकीच्या संदर्भात निवडणूक आयोगाच्या सूचना,आदर्श आचार संहिता, इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन याबाबत या बैठकीत माहिती देण्यात आली. यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक राजीव श्रीवास्तव, रजत अग्रवाल, केंद्रीय खर्च निरीक्षक प्रियंका गुलाटी, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, निवडणूक खर्च व्यवस्थापनचे अजित रेळेकर, एक खिडकी योजनेचे सुहास मापारी, इव्हीएम व्यवस्थापनचे विजयसिंह देशमुख आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम यांनी उपस्थितांचे शंका निरसन केले. निवडणूक खर्च आणि सोशल मिडीयावरील प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली. जिल्हाधिकारी राम म्हणाले, उमेदवाराकडून निवडणुकी दरम्यान वेळोवेळी विविध प्रकारच्या परवानग्या, परवाने घेतले जातात. त्या अनुषंगाने रॅली, मेळावे, रेडिओ प्रक्षेपण, व्हीडीओ चित्रीकरण, दूरदर्शन प्रक्षेपण, पथनाट्य, मोबाईलवरील एसएमएस, फेसबुक, सोशल मिडीयाद्वारे प्रचारयंत्रणा राबविली जाते. अशावेळी उमेदवार किंवा उमेदवारांच्या खर्चासाठी नेमलेल्या प्रतिनिधीकडून निवडणूक कार्यालयाला खर्चाची माहिती दिली जात नाही. त्यामुळे हिशोबामध्ये चूक होऊन तफावत निर्माण होते, म्हणून परवानगी घेतल्याबरोबर झालेल्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने लगेच दुस-या दिवशी असा खर्च खर्चाच्या नोंदवहीमध्ये सविस्तरपणे नोंदविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
केवळ राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सूचीतील नेत्यांचा (स्टार कॅम्पेनर) प्रवासावरील खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चाच्या हिशेबामध्ये समाविष्ट करण्यातून सूट देता येईल, बाकी इतर सर्व खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात धरावयाचा आहे, असे स्पष्ट करुन जिल्हाधिकारी राम म्हणाले, राजकीय पक्षांनी अन्य अधिसंघांनी केलेले /अधिकृत केलेले अन्य सर्व खर्च उमेदवारांच्या हिशोबामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे.
विजयसिंह देशमुख यांनी इव्हीएम, व्हीव्हीपॅट बाबतच्या प्रश्नांना तर निवडणूक खर्च व्यवस्थापनचे अजित रेळेकर यांनी खर्चविषयक प्रश्नांना उत्तरे दिली. बैठकीस विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि समन्वय अधिकारी उपस्थित होते.