मतदान यंत्राच्या सूक्ष्म प्रशिक्षणावर भर देण्याच्या निवडणूक निरीक्षकांच्या सुचना

685

शैलेंद्र चौधरी, नंदुरबार

मतदान प्रक्रीयेत त्रुटी राहू नये यासाठी मतदान यंत्रांच्या सुक्ष्म प्रशिक्षणावर भर देण्यात यावा आणि प्रशिक्षणानंतर आदर्श प्रश्नावलीच्या माध्यमातून मतदान कर्मचाऱ्यांची चाचणी घेण्यात यावी, अशा सुचना निवडणूक निरीक्षक शाहजाँह ए. यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.बैठकीस कायदा व सुव्यवस्था निरीक्षक शेखर कुमार, जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे,पोलीस अधीक्षक संजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा,अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार,उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे,उत्पादन शुल्क अधीक्षक मोहन वर्दे आदी उपस्थित होते.
श्री.शाहजाँह म्हणाले, निवडणूक प्रक्रीयेत व्हीव्हीपॅट यंत्राचा प्रथमच समावेश होत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काही व्हीव्हीपॅट यंत्रामधील स्लिपची मोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे संपुर्ण प्रक्रीया आणि यंत्राबाबत मतदान कर्मचाऱ्यांना सराव असणे आवश्यक आहे. अनुभवी कर्मचारी असले तरी प्रशिक्षणाचा दर्जा उत्तम राहली याची दक्षता घ्यावी.मतदान शांततेत होईल आणि मतदान अधिक प्रमाणात होईल यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे,असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, व्हीव्हीपॅटबाबत मतदारांमध्ये जागृतीचे उपक्रम सुरू ठेवावे. व्हीव्हीपॅटच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात यावे.आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे.दुर्गम भागाचे आव्हान लक्षात घेता असुविधा होणार नाही यासाठी पर्यायी नियोजनही तयार ठेवावे. 25 एप्रिलपर्यंत सर्व तयारी पुर्ण करावी,अशी सुचना त्यांनी केली.
त्यांनी मतदार जागृतीबाबत प्रशासनाने आयोजित केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. निवडणूक पूर्वतयारी तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. राष्ट्रीय महामार्गावरून होणाऱ्या वाहतूकीकडे विशेष लक्ष द्यावे,असे त्यांनी सांगितले.
श्री.शेखर कुमार म्हणाले, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांनी सुरू केलेल्या उपाययोजनांमध्ये निरंतरता ठेवावी.पैसे आणि प्रलोभनासाठीच्या वस्तूंची वाहतूक होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे.शेजारच्या राज्याला लागून असलेल्या भागात विशेष लक्ष देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी मंजुळे म्हणाले,मतदान शांततेच्या वातावरणात आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनातर्फे सर्व आवश्यक तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या सुचना उपयुक्त ठरतील.
पोलीस अधिक्षक श्री. पाटील यांनी पोलीस विभागाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.पोलिसांनी 9 परवाना नसलेले शस्त्रे जप्त केली असून 26 लाखाची अवैध दारू पकडण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.गौडा यांनी स्वीप कार्यक्रमाची माहिती दिली.बैठकीला सहायक निवडणूक अधिकारी, विविध समित्यांचे समन्वयक अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.