’६६ सदाशिव’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित
मल्हार न्यूज ऑनलाईन
विद्येची देवता ही श्री गणरायांची ओळख आहे. श्रींच्या १४ विद्या आणि ६४ कलांबद्दल आपल्याला माहित आहे, अलीकडच्या काळात जाहिरात ही ६५ वी कला म्हणून नावारूपाला आलेली आहे. आता यात आणखी भर पडली असून श्रीचं स्मरण करून ६६ व्या कलेबद्दल जाणून घेण्याची वेळ आली आहे. ही कला नेमकी कोणती? हे सांगण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी ’६६ सदाशिव’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
योगेश देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित “६६ सदाशिव” या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले असून यामध्ये मोहन जोशी यांच्या विविध भावमुद्रा बघायला मिळतात. एका पोस्टर मध्ये ’६६ व्या कलेत पारंगत होण्यासाठी उपयुक्त अभ्यासक्रम!’ अशा आशयाचे एक पुस्तक मोहन जोशी यांच्या हातात दिसते. या पोस्टर्समुळे चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढली असून हा चित्रपट, पुण्याच्या काही भन्नाट स्वभाव-गुणधर्मांचं हटके दर्शन घडवणार असे दिसते.
’६६ सदाशिव’ हा ‘पुणे टॉकीज प्रा. लि.’ यांची पहिली निर्मिती असून हेमंत गुजराथी, विनय वाकलकर, सौरभ चिंचणकर चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाला नरेंद्र भिडे यांचे संगीत लाभले असून छायांकन अजित रेड्डी यांचे आहे. मोहन जोशी यांच्यासह आणखी कोणते कलाकार चित्रपटात आहेत, हे जाणून घेण्यासाठी थोडे दिवस वाट पहावी लागणार आहे. ६६ व्या नव्या कोऱ्या कलेचा शोध घेऊन, त्याचं शास्त्र, रचना आणि आपल्या प्रत्येकाच्या जगण्यातलं या कलेचं अविभाज्य स्थान समजावून सांगणारा, भन्नाट व्यक्तिरेखांनी नटलेला ईरसाल कलाविष्कार असलेला ’६६ सदाशिव’ हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.