दापोली येथील निवडणूक तयारी; निवडणूक निरीक्षकांनी व्यक्त केले समाधान

750

रायगड गिरीश भोपी

३२ रायगड लोकसभा मतदारसंघाचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक रवींद्र सिंह यांनी आज दापोली तहसील कार्यालयास भेट देऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला तसेच मतदार जन जागृतीसाठी सुरु असलेल्याउपक्रम पाहिले व समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी त्यांनी ईव्हिएम यंत्र सील करणे तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी व मतदानानंतर मतदान यंत्रांची घ्यावयाची काळजी याचे प्रात्यक्षिकही पाहिले. मतदार जागृतीसंदर्भात उभारण्यात आलेल्या भव्य फलकावर देखील त्यांनी स्वाक्षरी केली. याप्रसंगी त्यांनी मॉडेल मतदान केंद्रासही भेट दिली.

निवडणूक प्रक्रियेतील आदर्श आचारसंहिता, निवडणूक खर्च संनियंत्रण कक्ष, मतदान केंद्र, निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम, मतदार व मतदान जागृती कार्यक्रम, वाहन व्यवस्था, कायदाआणि सुव्यवस्था, इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन्सची उपलब्धता, मतमोजणी केंद्र व प्रक्रिया यासंदर्भातील कामकाजाचा तसेच मतदानाची टक्केवारी याबाबतही त्यांनी आढावा घेतला.

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, निवडणूकीशी संदर्भित विविध कायदे व अधिनियम यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी तसेच निर्भय व निष्पक्ष वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडावी असे निर्देशही यावेळी निवडणूक त्यांनी दिले. यावेळी दापोली तहसीलदार समीर घारे उपस्थित होते.

मावळ निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा

३३ मावळ मतदारसंघासाठी नियुक्त सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक अशोक कुमार सिंग यांनी आज अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात बैठक घेऊन पूर्व तयारीचा आढावा घेतला. प्रारंभी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी त्यांना माहिती दिली.

रायगड जिल्ह्यातील १८८ पनवेल, १८९ कर्जत, व १९० उरण हे विधानसभा मतदारसंघ मावळ मतदारसंघात येतात.

अशोक कुमार सिंग यांनी या विधानसभा मतदारसंघातील नागरिक आणि मतदार याना आपण भेटणार आहोत असेही सांगितले. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस दुपारी ३ ते ५ व्हीव्हीआयपी सर्किट हाउस (हरित इमारत) कक्ष क्र ए-१०४ पुणे याठिकाणी निवडणूक निरीक्षक भेटण्यासाठी उपस्थित राहतील. त्यांचा भ्रमणध्वनी ८२७५९६९५०५ असा आहे.

मतदान साहित्य वेळेआधी व्यवस्थित पोहचतील या दृष्टीने नियोजन करावे , मनुष्यबळ पुरेसे व प्रशिक्षित आहेत किंवा नाहीत त्याची खात्री करून घ्यावी तसेच कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहील असे पाहावे अशा सुचना त्यांनी दिल्या. पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनीही पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरु असल्याची माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांची यावेळी उपस्थिती होती. प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी प्रास्ताविक केले.

———————-

थोर समाजसुधारक महात्मा जोतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे स्मरण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रारंभी उपजिल्हाधिकारी रोहयो रवींद्र मठपती तसेच इतर अधिकारी व कर्मचार्यांनी महत्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पे वाहिली.