अनिल चौधरी,पुणे
मुंबई काय आणि पुणे काय? ‘दहा बाय दहा’ म्हंटलं की नजरेसमोर येते एक जागा! मात्र, आता या जागेची चौकट तोडणारे धमाल विनोदी नाटक रंगभूमीवर अवतरले आहे. स्वरूप रिक्रिएशन अँड मीडिया प्रा.लि. निर्मित व अष्टविनायक प्रकाशित ‘दहा बाय दहा’ या नाटकाचा पुण्यात बालगंधर्व येथे नुकताच शुभारंभाचा प्रयोग पार पडला. मध्यमवर्गीय विचारांना आणि चौकटीला छेद देणा-या या नाटकाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
तसेच, विजय पाटकर यांना तब्बल २० वर्षांनंतर मराठी रंगभूमीवर पाहण्याची उत्सुकता रसिक प्रेक्षकांमध्ये दिसून आली. आहे.
अनिकेत पाटील दिग्दर्शित ‘दहा बाय दहा’ या धम्माल विनोदी नाटकांत विजय पाटकरांसोबत प्रथमेश परब, सुप्रिया पाठारे हे मराठीतील सुप्रसिद्ध कलाकारांची चांगलीच भट्टी जमून आली असून, तसेच विदिशा म्हसकर हा नवा चेहरादेखील या चौकडीत फिट बसला आहे.
संजय जामखंडी आणि वैभव सानप लिखीत हे नाटक, सामान्य माणसांना चौकटीबाहेर जाऊन विचार करण्यास प्रेरित करतं. त्यामुळे एन उन्हाळाच्या सुट्टीत नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत वेळ घालवण्याचा जर बेत आखत असाल, तर पुणेकरांसाठी ही चांगलीच संधी चालून आली आहे.