‘बाबो’चे ‘जीव पिरमात तुझ्या म्याड रं’ गाणे व्हायरल

1123

मल्हार न्यूज प्रतिनिधी,

दोन सुंदर जोडपी, सोबतीला व्हायोलिनची साथ आणि मनात प्रेमाची पालवी फुटेल असे लाघवी संगीत, शिवाय, सोबतीला गावाकडच सुंदरदृश्य, मातीतील अस्सल बोलीभाषा आणि प्रेमाच्या तालात थिरकायला लावणारे बोल म्हटल्यावर ‘जीव पिरमात तुझ्या म्याड रं’ अस म्हणण्याची वेळ येणारंच ना. ऐन उन्हाळ्यात प्रेमाचा फिवर वाढवणारे ‘जीव पिरमात तुझ्या  म्याड रं’ हे गाणे मल्हार फिल्मस् क्रिएशन निर्मित ‘बाबो’ या मराठी चित्रपटातील असून ते सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

‘बाबो’ या चित्रपटातील विविध कलाकरांच्या पात्रांची ओळख करून देणारी पोस्टर्स या पूर्वी प्रदर्शित करण्यात आली होती. या पोस्ट्स मधील मनोरंजक आणि खुमासदार शैलीतील वर्णन बघता, चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात आपसूक कुतूहल निर्माण झाले होते. नुकतेच प्रदर्शित झालेल्या ‘जीव पिरमात तुझ्या म्याड रं’ गाण्यामुळे प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

‘बाबो’ या चित्रपटाचे निर्माते सचिन बाबुराव पवार आणि सहनिर्मात्या तृप्ती सचिन पवार आहेत, हर्षवर्धन वावरे आणि कस्तुरी वावरे यांनी गायलेल्या ‘जीव पिरमात तुझ्या म्याड रं’ या गाण्याला हर्ष-करण-आदित्य (त्रिनिटी ब्रोज) यांनी संगीतबद्ध केले असून मंगेश कांगणे गीतकार आहेत. या गाण्यात रमेश चौधरी – मंजिरी यशवंत आणि अमोल कागणे – प्रतिक्षा मुणगेकर या युवा कलाकारांच्या जोड्या आहेत. या गाण्याचे नृत्य-दिग्दर्शन चेतन महाजन यांनी केले आहे. रमेश साहेबराव चौधरी दिग्दर्शित ‘बाबो’ ची कथा कथा अरविंद जगताप यांची आहे. येत्या ३१ मे रोजी ‘बाबो’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.