विद्यापीठामधून होणारे संशोधन समाजाभिमुख हवे – डॉ. शिवाजीराव कदम

1032

भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचा २४ वा स्थापनदिन समारंभ 

मल्हार न्यूज प्रतिनिधी : विद्यापीठातील संशोधनाचा समाजाला उपयोग व्हावा. विद्यापीठात जे संशोधन होते त्याचा समाजाला उपयोग झाला तर विद्यापीठांची विश्वासार्हता वाढेल असे मत भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांनी भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या २४ व्या स्थापना दिनानिमित्त व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर कुलगुरू प्रा.डॉ. माणिकराव साळुंखे, सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव, डॉ. म. शि. सगरे, श्री. व. भा. म्हेत्रे व कुलसचिव जी. जयकुमार उपस्थित होते. 

डॉ. कदम पुढे म्हणाले, आपले मूल्यमापन विद्यापीठातील प्रत्येक घटकाने स्वतःच केले पाहिजे. विद्यापीठात होणाऱ्या संशोधनाची गुणात्मकता हा चिंतेचा विषय आहे. सर्वोत्कृष्टतेचा ध्यास असल्याशिवाय उत्तम गोष्टी निर्माण होत नाहीत. यासाठी सर्वच विद्यापीठांना स्पर्धेसाठी सज्ज रहावे लागणार आहे. 

कुलगुरू माणिकराव साळुंखे म्हणाले, शिक्षण क्षेत्रासंबंधीचे निर्णय न्यायालयामार्फत होताना दिसतात. अकॅडेमिक कम्युनिटीचा दरारा कमी होताना दिसत आहे. माहिती, कौशल्य आणि कल्पकता यांची कास धरणारे शिक्षण हे स्पर्धेच्या युगात देणे गरजेचे आहे.कुलसचिव जी. जयकुमार यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती मंडलिक यांनी केले.