मल्हार न्यूज,प्रतिनिधी
मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा तरुण निर्माता ‘बाबो’ या आगामी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवत असून हा मल्टीस्टारर विनोदी चित्रपट ३१ मे ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी अमोलने विशेष मेहनत घेतली असून चित्रपटाच्या कथानकाची मागणी म्हणून अमोलने आपलं ७ किलो वजन केवळ एका महिन्याभरात घटवलं आहे.
दर्जेदार कलाकृतींची निर्मिती करणारे अमोल कागणे सध्या अभिनयातले खाचखळगे जाणून घेत आहेत. त्यासाठी लागेल तेवढे कष्ट घेण्याची तयारी दाखवत अमोल ७० एमएमवर एक स्टायलिश हिरोच्या अंदाजात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. अलीकडेच लॉन्च झालेलं ‘बाबो’ मधील ‘म्याड रं’ हे गाणं तसंच टिझरमधून आपल्याला अमोल कागणे यांच्या अभिनयाची एक झलक पहायला मिळतेय. त्यांचा हा नवीन अंदाज पाहून ह्यामागील रहस्य विचारले असता, ”मला ‘बाबो’ चित्रपटाची ऑफर आली त्यानंतर एका महिन्याने चित्रीकरणाला सुरवात होणार होती. त्यामुळे माझ्याजवळ स्वतःकडे जरा अधिक लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ होता. प्रत्यक्षात दिसणारं व्यक्तिमत्व पडद्यावरही तितकंच आकर्षक दिसावं याकरिता मी प्रॉपर डाएट आणि वर्कआउट फॉलो केला त्याचा अतिशय चांगला रिझल्ट मला आला, जो तुम्हीही पाहू शकता” असं निर्माते-दिग्दर्शक आणि अभिनेते अमोल कागणे यांनी सांगितलं.
‘म्याड रं’ या गाण्यातली अमोल कागणेंनी उडवून दिलेली धमाल सध्या सर्व म्युझिक चॅनेल्सवर पहायला मिळतेय. मराठी मनोरंजक्षेत्राला अमोल कागणेंच्या रूपानं एक प्रॉमिसिंग चेहरा नक्कीच भेटणार यात काही शंका नाही.