बदलत्या तंत्रज्ञाबरोबर वकीलांनी कार्यपध्दती बदलावी – अ‍ॅड. असीम सरोदे

780

मल्हार न्यूज (ऑनलाईन),पुणे 

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या हिन्दुस्तान देशातील न्यायपालीकेमध्ये जुन्या पद्धतीने कामकाज चालत असल्यामुळे वकील, पक्षकारांना काही अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे आधुनिक काळात न्यायपालीकेतील देखील कामकाज ‘डिजीटल’ होण काळाची गरज असल्याचे मत तज्ज्ञ वकीलांमार्फत व्यक्त करण्यात आले.              न्यायपालीकेतील कामकाज आधुनिक व्हावे यासाठी प्रयत्न करणार्‍या लीगलनेट द्वारा आयोजित करण्यात आलेल्या ‘लीगनेट फोरम’ या चर्चासत्रा दरम्यान वकील व तज्ज्ञांनी आपले मते व्यक्त केली. यावेळी माजी सत्र न्यायाधीश आर. व्ही. कुलकर्णी, पर्यावरण कायदे तज्ञ अ‍ॅड. असिम सरोदे, मुंबई उच्च न्यायालयातील वकील अ‍ॅड. सुकंद कुलकर्णी, अ‍ॅड. राजस पिंगळे, पुनीत कपूर, अ‍ॅड. अतुल जुवळे, लीगलनेट चे संस्थापक मंदार लांडे, गुरमीत सिंग, कपील जवेरी, चंद्रकांत भोजे पाटील,अनिरूध्द कोटगिरे,  अ‍ॅड. हर्षद काटीकर, अ‍ॅड. अक्षदा गुदाधे, विजय देशमुख, आदी यावेळी उपस्थित होते.   

          अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले, हिंदुस्थानातील न्यायपालीकेमध्ये जुन्या काळात कायद्याचा पुस्तकांचा ढिग घेऊन वकील युक्तीवाद करताना पहायला मिळायचे. बदलत्या तंत्रज्ञाबरोबर वकीलांच्या कार्यपध्दतीतही बदल होणे गरजेचे आहे. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. फौजदारी खटल्यांना लागणारा कालावधी पाहता अशा खटल्यांमध्ये आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणे गरजेचे आहे. मात्र अशा खटल्यांमध्ये डिजीटल प्रणाली वापरासाठी पोलिसांचे सहकार्य देखील तीतकेच महत्वाचे आहे.   

       अ‍ॅड. पिंगळे म्हणाले, कागदपत्रे बाळगण्या पेक्षा प्रत्येक वकीलाने स्मार्ट फोन किंवा टॅबलेटचा वापरून करून त्यामध्ये कागदपत्रे जमा केली पाहिजे. त्यामुळे कागदपत्रे बाळगणे सोपे होऊन जाईल. यावेळी उपस्थित तज्ञ वकीलांनी न्यायपालिकेच्या कामकाजामध्ये आधुनिक बदल का व्हावे याची माहिती दिली.

                        यावेळी देशभरातून अनेक वकिलांनी या चर्चा सत्रात सहभाग घेतला होता. ‘लीगल नेकस्ट’ या मासिकाच्या पहिल्या आवृतीचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. सामान्य जनतेपासून सर्वांना लीगलनेट हे हक्काच व्यासपीठ ठरेल असा विश्वास आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मान्यवरांनी व्यक्त केला.