अमेय वाघ त्याच्या ‘गर्लफ्रेंड’सह येणार २६ जुलैला

663

    अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्र

मल्हार न्यूज (ऑनलाईन)

अभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला ‘गर्लफ्रेंड’ मिळाली का? असे विचारले सुद्धा. अखेर या प्रश्नाचे उत्तर चित्रपटाच्या पोस्टर मधून मिळाले असून अखेर नचिकेत प्रधान म्हणजेच अमेयला त्याची अलिशा मिळाल्याचे दिसते आणि अलिशाच्या भूमिकेत महाराष्ट्राची सुपरस्टार अभिनेत्री सई ताम्हणकर दिसणार असल्याचेही या पोस्टरमधून स्पष्ट झाले आहे.

ह्यूज प्रॉडक्शन्स आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘गर्लफ्रेंड’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने अमेय आणि सई पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्याने प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. याचित्रपटात लेखक – दिग्दर्शक उपेंद्र सिधये यांनी आजच्या टेक्नोसॅव्ही जगातील एका मुलाची कथा मांडली आहे. या चित्रपटासाठी अमेयने खास तयारी केली असून त्याने नचिकेताच्या व्यक्तिरेखाठी तब्बल ८ किलो वजन वाढवले होते, तसेच त्याचा वेगळा लुक या चित्रपटामध्ये दिसणार आहे. तर सई ताम्हणकर हिचाही एक हटके अंदाज या पोस्टर मध्ये दिसत आहे. चित्रपटाच्या टीजर मध्ये ‘गर्लफ्रेंड तर पाहिजे ना यार’ असे म्हणत ‘मी गर्लफ्रेंड पटवणारच’ हा दृढनिश्चय केलेल्या नचिकेताला त्याची अलिशा कशी? कुठे? आणि कधी मिळाली? हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटाची निर्मिती अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांनी केली आहे. चित्रपटाला हृषीकेश, सौरभ, जसराज यांचे संगीत लाभले असून क्षितीज पटवर्धन यांची गीते आहेत. अमेय आणि सई अशी हटके जोडी असलेला ‘गर्लफ्रेंड’ हा चित्रपट येत्या २६ जुलै २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.