पालखी सोहळयामध्ये वारक-यांना सोई-सुविधा प्राधान्याने देण्यात याव्यात – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

840

पुणे प्रतिनिधी ,

 आषाढी वारीच्या निमित्ताने पुणे जिल्हयामध्ये पालखी सोहळयाच्या कालावधीमध्ये वारक-यांना सर्व सोई-सुविधा प्राधान्याने देण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केल्या. पालखी सोहळा – 2019 च्या पार्श्वभूमीवर पूर्व तयारीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये  आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख,जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, अमर माने,कार्यकारी अभियंता.ग्रामीण पाणी पुरवठा विभाग एस.एम.कदम.प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, बारामतीचे उप विभागीय अधिकारी हेमंत निकम, दौंड-पुरंदरचे उप विभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड  , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अजित कारंजकर, जिल्हा रुग्णालय,पुणेचे जिल्हा चिकीत्सक डॉ. अशोक नांदापूरकर,तहसिलदार हवेली,बारामती,इंदापूर, पुरंदर तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे प्रमुख विश्वस्त तसेच श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू चे पालखी सोहळा प्रमुख तसेच दोन्ही संस्थानचे प्रमुख विश्वस्त, शासकीय अधिकारी उपस्थ‍ित होते.

        या बैठकीमध्ये दिनांक 25 जून 2019 रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे तर दिनांक 24 जून 2019 रोजी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या काळात पुणे जिल्हयातील पालख्यांचा मुक्कामाच्या ठिकाणी तसेच पालखी मार्गावर  मांसाहारी हॉटेल, मच्छी मार्केट, कत्तलखाने व दारुची दुकाने बंद ठेवावीत, या सोहळयामध्ये सामील असणा-या वाहनांची तपासणी करणे व त्यांना फिटनेस प्रमाणपत्र देणे, वाहतुकीचे नियोजन, सुरळीत विद्युत व्यवस्था, सपाटीकरण, निर्माल्य  व्यवस्था इ. बाबींवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर वारक-यांना मुक्कामाच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा, शासकीय दरामध्ये रॉकेल, धान्य, अखंडीत वीज पुरवठा करण्याबाबत संबंधित यंत्रणांना आदेश देण्यात आले.

        यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी पुरवठा विभागाकडून देण्यात येणा-या सुविधा तसेच अग्नीशमन यंत्रणा इ.बाबतचा आढावा घेतला. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या कालावधीमध्ये पोलीस बंदोबस्त, वाहतुक नियोजन इ.बाबत संस्थानप्रमुखांशी चर्चा केली.

        यावेळी  दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वारीच्या काळात पाणीपुरवठयाचे नियोजन करण्यासाठी, पालखीतळांवरील खड्डे मुरुम भराई करुन व्यवस्थ‍ित करणे, आवश्यक त्याठिकाणी रोलींग करणे, पालखीतळांकडे जाणा-या रस्तयांवर दुकानदारांकडून होणा-या अतिक्रमणाबाबत तसेच पालखीमध्ये सामील वाहनांच्या पार्किंगबाबत चर्चा करण्यात आली तसेच याबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या.

       यावेळी संस्थानच्या प्रमुख पदाधिका-यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली.