7 जूनपासून “जुन्नर – आंबेगांव आंबा महोत्सव
पुणे:-
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने जुन्नर- आंबेगाव येथे “जुन्नर -आंबेगाव आंबा महोत्सव 2019” चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने पर्यटकांना कृषी पर्यटनाची संधी निर्माण होणार आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध होवून आंब्याच्या बागेत थेट जावून आंबे खरेदी करण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. तसेच आंबा उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच स्थानिकांनाही पर्यटनावर आधारित रोजगार निर्मिती होणार असून कृषी पर्यटन व ग्रामीण अर्थव्यवस्थेला या महोत्सवाच्या माध्यमातून बळकटी मिळणार असल्याची माहिती पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे माळशेजघाट पर्यटक निवास यांचे वतीने दिनांक 7, 8,9 जून तसेच 15, 16 जून 2019 रोजी “जुन्नर – आंबेगांव आंबा महोत्सव” चे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील जुन्नर, येणेरे, गिरवली, शिनोली, पारुंडे, निरगुडे, पिंपळगाव, सुपेधर आणि गंगापुर या ठिकाणी महोत्सव कालावधीत रोज सकाळी 10.00 ते 5.30 या वेळेत हा महोत्सव होणार आहे.
आंबा म्हटल्यावर आपल्याला रत्नागिरी, देवगड आठवते. रत्नागिरी, देवगड येथील आंबे प्रसिध्द असले तरी त्याच गोडीचे आणि गुणवत्तेचे आंबे पुणे जिल्ह्यातील जुन्नर व आंबेगांव तालुक्यात होतात. जुन्नर -आंबेगांव येथील आंब्यांचे वैशिष्ठ म्हणजे- या भागातील विविध आंब्यांचा आकार, रंग, सुगंध, चव ही वैशिष्ट्ये कोकण पेक्षाही थोडी वेगळी आहेत. येथील प्रदूषणमुक्त वातावरण, नैसर्गिकरित्या उत्पादन, जमीन, पाणी हे त्यामागील कारण आहे. फळांवर नैसर्गिक मऊसर मुलामा, पातळ साल, आकाराने पातळ, लहान कोय याबरोबरच वैशिष्टपूर्ण आंबटगोड चव ही यांची खास वैशिष्ट्ये आहेत. मात्र प्रसिध्दी अभावि या गोष्टीची माहीती फार झालेली नाही. ही उणीव ही या महोत्सवाच्या निमित्ताने दूर होईल, असेही पर्यटन मंत्री ना. रावल म्हणाले
आंब्याच्या बागेत जाऊन आंब्याची बाग पाहण्याबरोबरच थेट शेतक-याकडून आंबे खरेदी करण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. जुन्नर व आंबेगांव तालुक्यामध्ये पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम होत आहे. महोत्सवामधे पर्यटकांना आंब्याची बाग कशी असते, शेतकरी त्याचे उत्पादन कसे घेतात, आंब्याचे वेगवेगळे प्रकार कोणते, अशा नानाविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याबरोबरच आंब्याच्या प्रत्यक्ष बागेत जाउन चव चाखता येईल. तसेच आंब्याच्या बागेत भोजनाचा आस्वाद व आनंद घेता येणार आहे. याशिवाय थेट शेताच्या बांधावरून आंब्याची खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या आंबा महोत्सवात पर्यटकांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पर्यटन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहिती करिता संपर्क क्रमांक –
1) श्री. विष्णु गाडेकर, व्यवस्थापक, पर्यटक निवास, माळशेजघाट (7768036332, 9822043175)
2) श्री. निलेश बो-हाडे (9922847847), मु.पो. शिनोली, ता.आंबेगांव, जि. पुणे
3) श्री. महेश शेजवळ (9922868333), मु. पो. सुपेधर, ता. आंबेगांव, जि. पुणे
4) श्री. गणेश हगवणे (8600880111), मु.पो. गिरवली, ता. आंबेगांव, जि. पुणे
5) श्री. विजय येवले (9420174065), मु. पो. गंगापुर, ता. आंबेगांव, जि. पुणे
6) श्री. मिलींद अवटे 9767102703 मु. पो. गंगापुर, ता. आंबेगांव, जि. पुणे
7) श्री. राजेंद्र पवार (9975571007), मु.पो. पारूंडे, ता. जुन्नर, जि. पुणे