नाशिकमध्ये मुथूट फायनान्सवर दरोड्याचा प्रयत्न, गोळीबारात ऑडिटर ठार, तर तीन जखमी.
नाशिक :- नाशिकमध्ये दिवसेंदिवस चोरी, दरोड्यासह गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. सिटी सेंटर मॉल जवळच्या मुथूट फायनान्स कार्यालयाजवळ आज गोळीबार झाला. चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्याने हा गोळीबार केला. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या ऑडिटरचा मृत्यू झाला आहे. तर वॉचमनसह तीन जण जखमी आहेत. चोरट्याने राऊंड फायर केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
नाशिकच्या उंटवाडी परिसरात मुथूट फायनान्स कंपनी आहे. यावर सकाळी सकाळीच दरोडा टाकण्यासाठी सशस्त्र दरोडेखोर आले होते. त्यांच्याकडे रिव्हॉल्वर होती. चोरट्यांना जे कोणी अडवेल, त्यांच्यावर ते फायरिंग करत होते. या फायरिंगमध्ये तीन जण जखमी झाले. यामध्ये वॉचमन आणि ऑडिटसाठी दक्षिणेकडून आलेल्या अधिकाऱ्याचा समावेश आहे. या अधिकाऱ्याला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी आणलं होतं, मात्र त्यांचा मृत्यू झाला.
या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रं फिरवली आहेत. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे स्वत: घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र दिवसा ढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी हा गोळीबार झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. संपूर्ण शहर या प्रकाराने हादरलं आहे.