‘टकाटक’ कथानकाला सेक्स कॉमेडीचा तडका

1136

मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच विविध प्रकारचे विषय हाताळले जात असतात. धीरगंभीर मुद्यांपासून विनोदी विषयांपर्यंत सर्वच प्रकारचे चित्रपट मराठीत बनत असतात. आता सेक्स कॉमेडी हा आजवर मराठीत काहीसा मागे राहिलेला प्रकार मराठी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. आजवर ब-याच मराठी चित्रपटांचं यशस्वी दिग्दर्शन करणा-या दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी ‘टकाटक’ या आपल्या आगामी चित्रपटाला सेक्स कॉमेडीचा तडका दिला आहे. येत्या 28 जून रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि गांववाला क्रिएशन्सच्या बॅनरखाली बनलेला ‘टकाटक’ हा चित्रपट ट्रेलर आणि यातील गाण्यांमुळेअल्पावधीतच चर्चेचा विषय ठरला आहे. आपल्या अगोदरच्या चित्रपटांच्या माध्यमातून अंडर करंट काही ना काही मेसेज देणा-या मिलिंद कवडे यांनी आपल्या काहीशा अनोख्या शैलीत ‘टकाटक’चं दिग्दर्शन केलं आहे.

                चित्रपटाचा विषय आणि कथानकाला योग्य न्याय देऊ शकणारे कलाकार मुख्य् भूमिकेत असणं ही ‘टकाटक’ची खासियत आहे. प्रथमेश परबच्या जोडीला रितीका श्रोत्री ही अभिनेत्री या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं प्रथमच ही जोडी एकत्र आली असली तरी, ट्रेलरमध्ये या दोघांच्या केमिस्ट्रीची झलक पाहायला मिळते, त्यामुळे चित्रपटात ही जोडी धम्माल करणार याची खात्री पटते. एकमेकांना समजून घेत प्रथमेश-रितीकानं केलेला अभिनय आणि त्यांच्या जोडीला असलेली अभिजीत आमकर आणि प्रणाली भालेराव या आणखी एका नव्या कोNया जोडीची धम्माल ‘टकाटक’मध्ये अनुभवायला मिळणार आहे. त्यांच्या जोडीला भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर आदी कलाकारही विविध कॅरेक्र्ट्समध्ये दिसणार असल्यानं दमदार कलाकारांच्या अभिनयाची टकाटक फोडणी या चित्रपटात मिलिंद कवडे यांनी दिल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

                निर्माते ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी, इंदरजीत सिंग, अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम, रबिंद्र चौबे यांनी ‘टकाटक’ची निर्मिती केली आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये आणि उत्तम सादरीकरण ही या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू आहे. कथानकाला जे आवश्यक आहे ते सर्व उपलब्ध करून देत निर्मात्यांनी आपली जबाबदारी चोख बजावली आहे. या चित्रपटाची गीत-संगीताची बाजूही श्रवणीय आहे. गायक आनंद शिंदे यांच्या आवाजातील “आपला हात जगन्नाथ…’’ या गाण्यासोबतच जय अत्रेंनी लिहिलेलं आणि श्रुती राणे यांनी गायलेलं “ये चंद्राला या…’’ हे हॉट रोमँटिक गाणंही चांगलंच गाजत आहे. संगीतकार वरूण लिखते यांनी या चित्रपटातील गीतांना संगीत दिलं आहे. कथानकात महत्त्वाची भूमिका बजावणारी ही गाणी रूपेरी पडद्यावर पाहताना मन मोहून घेतील असा विश्वास मिलिंद कवडे यांनी व्यक्त केला आहे. ‘टकाटक’मध्ये जरी सेक्स कॉमेडी असली तरी कुठेही थिल्लरपणा किंवा वाह्यातपणाला वाव नाही. चित्रपटात घडणा-या घटनांना शंभर टक्के शुद्ध विनोदांची जोड देत प्रेक्षकांना हसवण्याचा प्रमाणिक प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. आजच्या काळातील प्रथेला प्रेमाचा गुलाबी रंग चढवत मनात दडलेल्या भावनांना वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न यात करण्यात आल्यानं चित्रपटामधील काही प्रसंगांशी प्रेक्षक स्वतःला रिलेट करतील अशी आशाही व्यक्त केली जात आहे. चित्रपटात जे घडतं ते उगाचच घडत नसून, त्यातही एक संदेश दडल्याची जाणीव चित्रपटगृहातून बाहेर पडताना प्रेक्षकांना नक्की होईल असं मिलिंद कवडे यांचं म्हणणं आहे.

                ‘टकाटक’चा ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांना खूप आवडले आहेत. अल्पावधीतच या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना विक्रमी हिट्स मिळाल्या आहेत, त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता आहे. मिलिंद कवडे यांनी अजय ठाकूर यांच्या साथीनं या चित्रपटाची गंमतीशीर कथा-पटकथा लिहिली आहे. संजय नवगीरे यांनी अर्थपूर्ण संवादलेखन केलं आहे. हजरथ शेख (वली) यांनी या चित्रपटाची अफलातून सिनेमॅटोग्राफी केली आहे.