शाहिदमय ‘कबीर सिंग’ 

1041

भूपाल पंडित

कोणत्याही भाषेत चित्रपट सुपरहिट झाला की त्याचा रिमेक अन्य भाषेत नाही झाला तरच नवल अशी सध्या परिस्थिती आहे. आता दक्षिणात्य ‘अर्जुन रेड्डी’ चा हिंदीत ‘कबीर सिंग’ बनून शाहिद कपूर प्रेक्षकांच्या भेटीला येतो. चित्रपटाच्या प्रोमोज आणि ट्रेलर वरून या चित्रपटात नेमकं काय असेल याचा अंदाज येतोच, किसिंग सीन्स, मद्य आणि ड्रग्जच्या दृश्यांचा भडिमार असलेला हा चित्रपट शाहिद कपूरच्या आजपर्यंतच्या करियर मधील त्याचा सर्वोत्तम अभिनय दाखवणारा आहे.

कबीर सिंग’ चित्रपटाची कथा दिल्लीच्या मेडिकल कॉलेज मधून सुरू होते. अत्यंत गरम डोक्याचा, निर्भीड, स्वतःच्या मानाने वागणारा हुशार वैद्यकीय विद्यार्थी असलेला कबीर सिंग (शाहिद कपूर) हा प्रीती सिकका (कियारा आडवाणी) हिच्या प्रेमात पडतो. तिच्यासाठी तो इतका वेडा होतो की तिच्याशिवाय दुसरं काही त्याला सुचतच नाही. पण दुर्दैवाने घरच्यांच्या विरोधाने तिचं लग्न होतं आणि मग मुळातच गरम डोक्याचा हा सर्जन  स्वतःवरचा ताबा हरवून बसतो. दारू, ड्रग, सेक्सच्या नादी लागतो. स्वतःची वाट लावायला सुरुवात करतो. पुढे नक्की काय होते हे जाणून घेण्यासाठी ‘कबीर सिंग’ चित्रपटगृहात जाऊन बघायला हवा.

दाक्षिणात्य ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनीच ‘कबीर सिंग’चे दिग्दर्शन केले आहे. मूळ चित्रपटाच्या कथेतील शहर बदलले असले तरी कथानकात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. थोडक्यात काय तर ‘कबीर सिंग’ म्हणजे फ्रेम टू फ्रेम रिमेक आहे. चित्रपटाची नॉनलिनियर पद्धतीने मांडण्यात आली आहे, यामुळे अगदी पहिल्या फ्रेम पासून चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण होते, चित्रपटातील संवाद नक्कीच चांगले आहेत. कॉलेज वातावरण थोडे काल्पनिकते कडे झुकणारे आहे, मध्यंतरा नंतर काही ठिकाणांचे अंदाज लावताना गोंधळ उडतो, तर काही फ्रेम मध्ये यापूर्वी येऊन गेलेल्या हिट चित्रपटांची आठवण येते. चित्रपाटाची लांबी थोडी कमी असती तर चित्रपट अधिक प्रभावी झाला असता असे वाटते.

कलाकारांच्या अभिनयाबडाळ सांगायचे तर अभिनेता शहीद कपूरच्या करियर मध्ये हा चित्रपता मैलाचा दगड ठरणार हे निश्चित. कबीर सिंगच्या भूमिकेत तो अगदी फिट्ट बसला आहे, त्याने कबीर ही व्यक्तिरेखा जगल्याचे त्याच्या अभिनयातून दिसते. पहिल्या दृश्यापासून त्याने आपला प्रभाव पडद्यावर टाकला असल्याचे दिसते. अभिनेत्री कियारा आडवाणीच्या वाट्याला फार मोठी भूमिका नसली तरी प्रितीच्या व्यक्तीरेखेसाठी तिने उत्तम काम केले आहे. अर्जन बावेजा, सुरेश ओबेरॉय यांनी योग्य साथ दिली आहे. कबीरच्या मित्राच्या भूमिकेतील सोहम मुझुमदार आपली छाप सोडण्यात यशस्वी झाला आहे.

प्रेमकथा म्हटलं की गाणी आली, या चित्रपटात सुद्धा उत्तम गाणी आहेत. मात्र एकही गाणे कथेच्या आड येत नाही, सर्व गाणी बकग्राऊंडला येतात यामुळे कथेचा वेग काम राहतो. लोकेशन चांगली घेण्यात आली आहेत, सिनेमा डोळ्यांना सुखद आहे. जोडीला ऍक्शनची दृश्येही सिनेमाच्या गाभ्याला साजेशीच आहेत. ‘कबीर सिंग’बदल थोडक्यात सांगायचे तर तुम्हाला फुल्ल रोमांटिक किंवा ऍक्शनपट आवडत असेल तर हा चित्रपट बघू शकता तसेच शाहिद कपूरसाठी हा चित्रपट एकदा बघायला हरकत नाही,

चित्रपट   – कबीर सिंग

निर्माता     –  : टी सिरिज, सिने वन

दिग्दर्शक –  संदीप रेड्डी वांगा

संगीत –  मिथुन, विशाल मिश्रा, अमल मलिक, अखिल सचदेव, संचेत-परंपरा

कलाकार  – शाहिद कपूर, कियारा अडवाणी, अर्जन बावा, सुरेश ओबेरॉय,सोहम मुझुमदार, निकिता दत्ता, कामिनी कौशल.

रेटिंग – ***

–    भूपाल पंडित 

pbhupal358@gmail.com