आगामी ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री सई ताम्हणकरचा वाढदिवस चित्रपटाच्या टीमने अनोख्या पद्धतीने तिला सरप्राईज देत साजरा केला. या वेळी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने सईला कुठलीही जाणीव न होऊ देता वाढदिवसाचे नियोजन केले होते. चित्रपटाचे अर्जंट शूट असल्यामुळे चित्रपटाच्या सर्व कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनीसेटवर एकत्र यावे असे सांगण्यात आले, मात्र सई तिथे आल्यावर आज शूटींग नसून ही सर्व मंडळी आपला वाढदिवस एक दिवस आधी साजरा करण्यासाठी एकत्र जमल्याचे समजताच तिला आश्चर्याचा धक्का बसला.
या वेळी चित्रपटाच्या निर्मात्या विधि कासलीवाल म्हणाल्या, “आम्ही सईचा वाढदिवस मुद्दाम आधी साजरा केला, कारण सईला तिच्या वाढदिवशी असणारे तिचे प्लॅन्स बदलावे लागू नयेत. सई वगळता सेटवर सर्वांना या सरप्राईजची पूर्व कल्पना होती. अशा आनंदाच्या प्रसंगी सर्वांनी सईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत केकचा आस्वाद लुटला.”
मोहित टाकळकर दिग्दर्शित ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटात सई ताम्हणकर बरोबरच अभिनेता ललित प्रभाकर, अभिनेत्री पर्ण पेठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचेचित्रीकरण सध्या अंतिम टप्प्यात असून चित्रपटाचा मोठा भाग चित्रित झाला आहे.