महिलांसाठीच्या महत्त्वपूर्ण कायद्याच्या जागृतीसोबतच शासनाच्या महिलांसाठीच्या योजनांची माहिती पोहचविण्यासाठी व शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने राज्य महिला आयोगाने सुरू केलेला ‘वारी नारीशक्ती’ चा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गो-हे यांनी व्यक्त केला.
राज्य महिला आयोगाच्या वतीने यावर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या पालखी सोहळ्यामध्ये ‘वारी नारीशक्ती’ची या उपक्रमांतर्गत चित्ररथ आणि महिला सक्षमीकरणाची दिंडी काढण्यात आली आहे. या चित्ररथाचा आणि दिंडीचा शुभारंभ आज शनिवारवाडा येथे झाला. यावेळी डॉ. गो-हे बोलत होत्या. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, संत साहित्याचे अभ्यासक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे उपस्थित होते. वारी हे प्रबोधनाचे पहिले पाऊल असल्याचे सांगून डॉ. गो-हे म्हणाल्या, पुणे शहराला एक वेगळी परंपरा लाभलेली आहे, त्या पुणे शहरातून या महिला प्रबोधनाच्या वारीचा शुभारंभ झाला, हे कौतुकास्पद आहे. शासन महिलांच्या सन्मानासाठी काम करत आहे, महिलांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीच्या दृष्टीने कायम पाठपुरावा करणार असल्याचे सांगून ‘वारी नारीशक्ती’ चाराज्य महिला आयोगाच्या पुढाकारातून सुरू झालेला उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक करताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रहाटकर यांनी महिलांसाठीच्या महत्वपूर्ण कायद्यांबाबत जागृती, त्यांच्यासाठी असलेल्या सरकारी योजनांची माहिती पोहोचविणे, हा उपक्रमामागचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले. महिलांच्या सक्षमीकरण व सबलीकरणाची ही वारी आहे. वारीमध्ये प्रत्येक महिलेला सन्मान मिळतो, वारी समानतेचे प्रतीक असल्यानेच ‘वारी नारीशक्ती’ चा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.
महापौर टिळक यांनी राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ‘वारी नारीशक्ती’ उपक्रमातून महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होईल. महिला सक्षमीकरणाचे सुरू असलेले कार्य नक्कीच महिलांसाठी उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.
संत साहित्याचे अभ्यासक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी ही आपले विचार व्यक्त करून या उपक्रमाला वारकरी बांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी वारीत सहभागी महिला वारकरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
* वारी नारीशक्तीची वैशिष्टये :
१. दोन्ही मार्गांवरील चित्ररथांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सची व्हेडिंग मशीन्स आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ‘इनसिनेटर मशीन्स’ असतील. नॅपकिन वापरांबाबत आणि पर्यायाने मासिक पाळीतील स्वच्छतेबाबत जागृती करण्याचा हेतू या मागे आहे. यासाठी महिला व बाल कल्याण मंत्रालयाने भरीव सहकार्य केले आहे.
२. फिरता चित्रपट महोत्सव : महिला सक्षमीकरणाचे संदेश देण्यासाठी वारीच्या दोन्ही मार्गांवर फिरता चित्रपट महोत्सव आयोजित केला जाणार आहे. मुक्कामाच्या प्रत्येक ठिकाणी महिला सक्षमीकरणाचे संदेश देणारे चित्रपट (उदा. ‘दामिनी’, ‘पॅडमॅन’, ‘दंगल’, ‘टाॅयलेट एक प्रेमकथा’) आणि काही निवडक लघुपट दाखविले जातील.
३. महिला कीर्तनकार, पोवाडाकार आणि भारूडकार यांचेही ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले आहेत. महिला सक्षमीकरण या संकल्पनेवर त्यांचे कार्यक्रम असतील.
४. सक्षमीकरणाच्या दिंडीमध्ये दररोज एका क्षेत्रातील नामवंत असतील. त्यामध्ये मराठी चित्रपट कलाकार, आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या विधवा, वीरमाता- वीरपत्नी, उद्योगिनी, डाॅक्टर्स,क्रीडापटू, वकील, वास्तूरचनाकार, बचत गटही असतील. मुस्लिम महिलांचे पथकही या दिंडीमध्ये सहभागी होणार आहे.