आंबेगावात सीमाभिंत कोसळून 6 मजुरांचा मृत्यू

763

मल्हार न्यूज

मुसळधार पावसामुळे आंबेगाव येथील सिंहगड कॉलेजची सीमाभिंत मजुरांच्या झोपड्यांवर कोसळून मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या भीषण दुर्घटनेत सहाजण मृत्युमुखी पडले असून तिघेजण जखमी झाले आहेत. तब्बल 15 जणांचा बळी घेणारी कोंढव्याची दुर्घटना ताजी असतानाच त्याची पुनरावृत्ती आंबेगाव येथे घडली आहे.
या घटनेमध्ये राधेलाल पटेल(वय 25), जेटू लाल पटेल ( वय 50), ममता राधेलाल पटेल ( वय 22), जितू चंदन रवते ( वय 24), जेटूलाल पटेल( वय 45), ममता पटेल ( वय 24). मृत्युमुखी पडलेले सर्व मजूर छत्तीसगड राज्यातील आहेत.
आंबेगाव येथील सिंहगड कॅम्पसच्या सीमाभिंतीलगत मजुरांच्या तात्पुरत्या झोपड्या होत्या. सर्वजण गाढ झोपेत असताना हा सीमाभिंत अचानक कोसळली आणि त्याखाली मजुरांच्या झोपड्या गाडल्या गेल्या. पडलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली मजूर आणि त्यांचे कुटुंबीय अडकून पडले.
दुर्घटनेचे वृत्त समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. आतापर्यंत अग्निशामक दलाने सहा पुरुष व तीन महिलांना जखमी अवस्थेत बाहेर काढले. त्यापैकी सहाजणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याचे समजते. मृतांमध्ये ४ पुरुष व २ महिलांचा समावेश.
एनडीआरएफच्या जवानांचे पथक देखील घटनास्थळी पोहचले असून दगड-मातीचा ढिगारा उपसण्याचे व त्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, हे शोधण्याचे काम सुरू आहे.