मल्हार न्यूज, पुणे
हवेली तालुक्यातील आंबेगाव बुद्रुक येथे सिंहगड इन्स्टिट्यूटच्या परिसरातील झाड भिंतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा व्यक्ती मृत्यू पावल्या. कामगार राज्यमंत्री संजय (बाळा )भेगडे आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. मृत्यू पावलेल्या व्यक्ती छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील असून त्यांचे मृतदेह त्यांच्या गावी पाठविण्यात येत आहेत. एनडीआरएफ आणि प्रशासन यांच्या वतीने बचाव कार्य पूर्ण करण्यात आले आहे. आंबेगाव दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.तत्पूर्वी राज्यमंत्री श्री. भेगडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कोंढवा तसेच आंबेगाव बुद्रुक येथील घटनेचा आढावा घेतला. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी सचिन बारावकर कामगार उपायुक्त विकास पनवेलकर, विठ्ठल बनोटे आदी उपस्थित होते.राज्यमंत्री श्री. भेगडे यांनी भारती हॉस्पीटलला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे उपस्थित होते.
आज बैठक
कोंढवा परिसरात नुकतीच दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीने वेगवेगळ्या ठिकाणांची पाहणी केली आहे. पुणे शहर आणि परिसरात अशा दुर्घटना होऊ नये यासाठी उद्या बुधवार दिनांक 3 जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती श्री.भेगडे यांनी दिली. या बैठकीस जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त, पीएम आरडीए, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस आयुक्त तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.