सामुहिक वनहक्क क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण

1083

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सामुहिक वनहक्क क्षेत्रावर 1 लाख 86 हजार उपयुक्त रोपांची लागवड करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी प्राधान्याने अशा कामांना गती देण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
शासन,प्रशासन,गाव स्तरावरील वन नियोजन समिती आणि लोकसमन्वयक प्रतिष्ठानच्या सक्रीय सहभागातून वन कायद्याच्या मूळ उद्देशाकडे वाटचाल सुरू आहेबराज्यात सुरू असलेल्या 33 कोटी वृक्ष लागवड अभियानाच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमात सामुहिक वनहक्क क्षेत्रावर एक हेक्टर क्षेत्रात 1 हजार 111 याप्रमाणे सामाजिक वनीकरण विभागामार्फत104 हेक्टरवर 1 लाख 15 हजार 544 तर वन विभागामार्फत 64 हेक्टर क्षेत्रात 62 हजार 216 रोपांची लागवड करण्यात येणार आहे.
सामुहिक वनहक्क क्षेत्राची निवड करण्यात आली असून त्यात नंदुरबार तालुक्यातील वाघाळे,अंबापुर,सुतारे, अजेपुर,अक्कलकुवा तालुक्यातील सरी,दहेल, वालंबा,रोजकुंड,भराडभ्पादर, खाई,गुलीआंबा,भगदरी,कुंडी अशा 13 गावातील 104 हेक्टरवर सामाजिक वनीकरण विभागातर्फे 1 लाख 15 हजार 544 वृक्ष लागवड करण्यात येणार आहे उप वनसंरक्षक नंदुरबार वन विभाग शहादामार्फत बुरुमपाडा, तोरणमाळ प.,सिंधी, लेगापाणी,निगदी,कुंभरी या गावातील प्रत्येकी 8 हेक्टरप्रमाणे 48 हेक्टर क्षेत्रावर 53 हजार 328 वृक्ष लागवड करण्यात येणर आहे. तर उप वनसंरक्षक मेवासी वन विभाग तळोदा विभागामार्फत अमोणी आणि मालदा या गावातील 16 हेक्टर क्षेत्रावर 17 हजार 776 वृक्ष लागवड करण्यात येणार आहे आंबा,जांभुळ,चिंच,बोर, आवळा,सिताफळ,बेल,शेवगा, कवठ,खैर,बांबू,कडुनिंब,पेरु, आवळा,वड,बेहडा आदी उपयुक्त वृक्षांचा यात समावेश असल्याने जिल्ह्यातील वनराई वाढण्याबरोबरच दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांना याचा भविष्यात आर्थिक लाभदेखील होऊ शकेल.गावातील नागरिकांची क्रयशक्ती वाढून रोजगारासाठी होणारे हंगामी स्थलांतराचे प्रमाणही कमी होऊ शकेल.
ग्रामीण भागातून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून नागरिकांच्या सहभागामुळे वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला गती मिळाली आहे. सामाजिक वनीकरण आणि वन विभागाच्या माध्यमातून आवश्यक रोपे उपलब्ध करून देण्यात येत आहे मग्रारोहयोच्या माध्यमातून ग्रामस्थांना गावातच काम उपलब्ध होत असल्याने या उपक्रमाचा दुहेरी फायदा त्यांना मिळणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उपक्रमाच्या क्रीयान्वयनावर सातत्याने लक्ष दिले जात असून त्याचा दैनंदिन आढावादेखील घेण्यात येत आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून लोकसहभागाद्वारे ग्रामीण भागात वनराई निर्माण होणार आहे विभागीय वनअधिकारी अ.के.
धानापुणे,उपवनसंरक्षक एस.बी.केवटे,अनिल थोरात, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे, लोकसमन्वयक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय महाजन आदी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.बालाजी मंजुळे,जिल्हाधिकारी-जिल्ह्यात सामुहिक वनहक्क क्षेत्रावर वृक्ष लागवडीचा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. एकूणच ग्रामीण विकासाला अपेक्षित असलेला लोकसहभाग या उपक्रमात दिसून येत आहे. दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना सक्षम करण्यासाठी अनेक स्तरावर होत असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.
प्रतिभा शिंदे,सामाजिक कार्यकर्त्या-जिल्ह्यातील 30 आदिवासी गावांनी वन अधिकाराच्या माध्यमातून आपले गाव हरित करण्याचा संकल्प केला आहे.मनरेगाची जोड देत गावात रोजगार उपलब्ध करून दोन लाख फळझाडे व इतर उपयुक्त रोपे लावण्यात येणार आहेत.त्यातून ग्रामसभेला उत्पन्न मिळणार गाव अधिक सक्षम करता येईल.

—-

अजेपूर येथे सामुहिक वनहक्क क्षेत्रावर वृक्षारोपण

तालुक्यातील अजेपूर येथे सामाजिक वनीकरण विभाग,सामुहिक वनव्यवस्थापन समिती आणि लोकसमन्वय प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सामुहिक वनहक्क क्षेत्रातील 8 हेक्टर क्षेत्रावर वृक्षारोपणाचा शुभारंभ केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाअंतर्गत प्रशिक्षण महासंचालनालयाचे महासंचालक राजेश अग्रवाल आणि जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, विभागीय वनअधिकारी अ.के. धानापुणे,तहसीलदार भाऊसाहेब थोरात,गटविकास अधिकारी अशोक पटाईत, सरपंच धर्मा गवळी,वनहक्क समितीचे अध्यक्ष वादया गवळी आदी उपस्थित होते यावेळी बोलताना बालाजी मंजुळे म्हणाले,महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सामुहिक वनहक्क क्षेत्रावर लावण्यात येणाऱ्या वृक्षांमुळे गावाला उत्पन्न मिळणार असून खऱ्या अर्थाने गावाची वाटचाल समृद्धीकडे होणार आहे या माध्यमातून जंगल संवर्धन चांगल्यारितीने होईल. ग्रामस्थांनी जंगल वाढविण्यासाठी आणि त्याचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावे,असे आवाहन त्यांनी केले.सामुहिक वनहक्क क्षेत्रात वृक्ष लागवड वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी अग्रवाल आणि बालाजी मंजुळे यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. गावातील आठ हेक्टर क्षेत्रावर बांबू,करंज,कडूलिंब,आवळा, सिताफळ आदी उपयुक्त रोपे लावण्यात येणार आहे. श्री.अग्रवाल यांनी यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधला. सामुहिक वनहक्काच्या माध्यमातून गावाला गौण वनउपज मिळून आर्थिक लाभ होईल,असा विश्वास ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला.