भूपाल पंडित, पुणे
दिग्दर्शक मंगेश हडवळे यांनी ‘टिंग्या’ या मराठी चित्रपटातून राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घालत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. आता ‘मलाल’ मधून त्यांनी बॉलीवूड मध्ये पदार्पण केले असून या चित्रपटाची निर्मिती संजय लीला भन्साळी यांनी केली आहे, तर मिजान जाफरी आणि शर्मीन सेहगल या स्टार किडस ची एन्ट्री होत आहे.
‘मलाल’ हा २००४ साली आलेल्या ‘७ जी रेनबो कॉलनी’ या तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे. मुंबईतील आंबेवाडी चाळीत राहणारा शिवा मोरे (मिजान) दिवसभर आपल्या मित्रांसोबत उनाडक्या करत फिरत असतो, एके दिवशी आस्था त्रिपाठी ( शर्मिन सेहगल) आपल्या कुटुंबासोबत या चाळीत राहायला येते, तिचे वडील शेअर मार्केटमध्ये कार्यरत होते, व्यवसायात मोठा तोटा सहन करावा लागल्याने या श्रीमंत कुटुंबावर चाळीत शिफ्ट होण्याची वेळ येते. सीएचा अभ्यास करणारी आस्था शिवाच्या प्रेमात पडते. शिव महाराष्ट्रीयन तर आस्था उत्तर भारतीय त्यामुळे तिचे कुटुंब त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करत नाही. आता एकमेकांचं प्रेम मिळवण्यासाठी हे दोघं काय पाऊल उचलतात हे जाणून घेण्यासाठी ‘मलाल’ बघावा लागेल.
दिग्दर्शक मंगेश हडवळे यांनी यापूर्वी केलेला ‘टिंग्या’ वास्तववादी होता, तर ‘मलाल’ हा टिपिकल हिंदी चित्रपट आहे. यामध्ये अॅक्शन, लव्हस्टोरी, डान्स, कॉमेडी, इमोशन्स, संगीत असा सगळा मसाला ठासून भरला आहे. पण कथेमध्ये काहीच नाविन्य नाही. सुरुवातीला येणारा अमराठी लोकांना हुसकावून लावण्याचा मुद्दा पुढे अचानक गायब झालेला आहे. नव्वदच्या दशकात घडणारी ही कथा आपण त्याच दशकातल्या अनेक चित्रपटात बघितली आहे. बऱ्याच ठिकाणी हा सिनेमा विस्कळीत वाटतो. तर बऱ्याच ठिकाणी रेंगाळलेला वाटतो. कथेत कुठलंही नाविन्य नसल्यामुळे पुढे काय होणार याची प्रचिती तुम्हाला येत राहते. चित्रपटाचे निर्माते संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात दिसतात तसे भव्य सेट इथे नाहीत. ९० च्या दशकातील चाळीतलं वातावरण दिग्दर्शकानं उत्तम दाखवलं आहे. याचं श्रेय सिनेमॅटोग्राफर रागुलला द्यावे लागेल.
कलाकारांच्या अभिनायाबद्दल सांगायचे तर मिजान आणि शर्मिनचा हा पहिलाच चित्रपट आहे. दोघांनाही अजून बरीच मेहनत घेण्याची गरज आहे. मिजान कॅमेऱ्यासमोर अजून कम्फर्टेबल दिसत नाही. बऱ्याच सीनमध्ये त्याने प्रभावी केलं असलं, तरी त्याला अजून बऱ्याच बारकाव्यांवर मेहनत घ्यावी लागणार आहे. डान्स करता आला, पिळदार शरीरयष्टी कमावली, थोडीफार अॅक्शन केली म्हणजे झालो बाबा एकदाचं हिरो या समजातून बाहेर पडून मिजानला त्याच्या कमकुवत बाबीवर मेहनत घेण्याची खऱंच गरज आहे. शर्मिन त्याच्या पेक्षाही बरीच मागे आहे. बऱ्याच प्रसंगात तर तिची संवादफेकही खटकते. राजकारण्याच्या छोट्या भूमिकेत समीर धर्माधिकारी तर शिवाच्या आईच्या भूमिकेत चिन्मयी सुमित लक्षात राहतात.
चित्रपटाचे संगीतही फारसे प्रभावी नाही. संजय लीला भन्साळींच्या चित्रपटाचे संगीत नेहमीच हिट असते, पण ‘मलाल’ त्याला अपवाद ठरला आहे. आदर्श शिंदेच्या आवाजातील ‘उधळ हो’ वगळता एकही गाणं लक्षात राहत नाही.
एकंदरीत काय तर संजय लीला भन्साळींची निर्मिती, अप्रतिम सिनेमॅटोग्राफी असूनही पटकथेचा अभाव आणि मिजान – शर्मीन जोडीचा प्रभाव न पडल्यामुळे ‘मलाल’ निराश करतो.
चित्रपट – मालाल
निर्मिती – संजय लीला भन्साळी, भूषण कुमार
दिग्दर्शक – मंगेश हडवळे
संगीत – संजय लीला भन्साळी, श्रेयस पुराणिक
कलाकार – मिझान जाफरी,शर्मिन सेहगल,चिन्मयी सुमित,अनिल गवस, समीर धर्माधिकारी
रेटिंग – **
– भूपाल पंडित
pbhupal358@gmail.com