दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम अवयव वाटपासाठी शिबीर

788

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली,जिल्हा प्रशासन नंदुरबार व महात्मा गांधी सेवा संघ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील गरजू दिव्यांग बंधु-भगिनींना आवश्यकतेनुसार लागणाऱ्या कृत्रिम अवयव व साधने मोफत वाटप करण्यासाठी 24 जुलै रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा रुग्णालयात नाव नोंदणी व मोजमाप/तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
तपासणी शिबीरामध्ये तीनचाकी सायकल,व्हीलचेअर,श्रवणयंत्र, कुबडी,एम.आर.किट,कॅलिपर, स्प्लिंट,जयपुर फुट,कमोड चेअर, वॉकर, एल्बो क्रचेस, क्रचेस, वॉकिंग स्टिक,अंधचष्मा,अंधकाठी,ब्रेलकिट इत्यादी साहित्याचे वाटप करण्यासाठी नाव नोंदणी करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी नाव नोंदणी व मोजमापासाठी बुधवार 24 जुलै 2019 रोजी सकाळी 10 ते सायं. 4 वाजेदरम्यान जिल्हा रुग्णालय
नंदुरबार येथे उपस्थित रहावे लाभार्थ्यांनी येतांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र,आधारकार्ड,प्रतिमाह
15 हजाराच्या आत उत्पन्नाचे प्रमाणपत्र(खासदार,आमदार, तहसिलदार,तलाठी,नगरसेवकग्रामसेवक यांचे)सोबत आणावे जिल्ह्यात आदिवासी भागातील गरजू व्यक्तींना शिबिराच्या माध्यमातून मोफत कृत्रिम अवयव उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नोंदणी केल्यानंतर शिबिराचे आयोजन करून कृत्रिम अवयव व उपकरणांचे वाटप करण्यात येईल या शिबीरात गरजू दिव्यांग व्यक्तींनी नांव नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी केले आहे.
0 0 0 0 0 0 0 0 0 0

कंत्राटी तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
मुलाखतीनंतर तात्काळ दिले नियुक्ती आदेश नंदुरबार

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यातील रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे तदर्थ वैद्यकिय अधिकारी म्हणून कंत्राटी पध्दतीने 11 महिन्यांसाठी अटी व शर्तीच्या अधिन राहून भरण्यात आली असून 9 पात्र उमेदवारांना जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या हस्ते नियुक्तीचे आदेश तात्काळ देण्यात आले जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा बळकट करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी म्हणून कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे या पदांसाठी आज मुलाखत घेण्यात आली होती पावसाळा सुरू असल्याने नागरिकांना वेळेवर उपचार मिळणे सोईचे व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत प्रशासकीय गतीमानातेद्वारे पात्र 9 उमेदवारांना त्यांना पाहिजे त्याठिकाणी आजच पदस्थापनेचे आदेश प्रदान केले. नव्याने नियुक्त अधिकारी नागरिकांना सेवाभावनेने चांगल्या आरोग्य सुविधा देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या वैद्यकीय अधिकाऱ्यांना उद्यापासून नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.