साहसी क्रिडा प्रकार आयोजित करणाऱ्या संस्थांसाठी जिल्हास्तरीय बैठक

846

मल्हार न्यूज , पुणे

साहसी क्रिडा प्रकारातील होणारे अपघात टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दि. 26 जुलै 2018 रोजी साहसी क्रिडा प्रकारातील गिर्यारोहण, माऊंटनिअरिंग, स्कीईंग, पॅरासेलिंग, हवाई क्रिडा स्पर्धा (हॅग्लायडींग, पॅराग्लायडिंग) जलक्रिडा आयोजित करणाऱ्या संस्थांसाठी सुधारीत नियम व मार्गदर्शन सुचना निर्गमित करण्यासाठी आणि साहसी प्रकारातील कार्य करणाऱ्या संस्थांची नोंदणी जिल्हास्तरावर करण्यासाठी मा. जिल्हाधिकारीसो यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार सदरच्या संस्थांच्या नोंदणीसाठी मा. जिल्हाधिकारीसो यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट़ पर्यटन विकास महामंडळ हे सदस्य सचिव असुन जिल्हा क्रिडा अधिकारी हे सह सदस्य सचिव आहे. तसेच मा. पोलीस आयुक्त, कार्यकारी अभियंता सिंचन विभाग, विभागिय वनअधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक आणि साहसी क्रिडा प्रकाराचे आयोजन करणाऱ्या जिल्हयातील अनुभवी संस्थांचे 2 प्रतिनिधी हे सदस्य आहेत.
साहसी क्रिडा प्रकारातील गिर्यारोहण, माऊंटनिअरिंग, स्कीईंग, पॅरासेलिंग, हवाई क्रिडा स्पर्धा (हॅग्लायडींग, पॅराग्लायडिंग,) जलक्रिडा आयोजित करणाऱ्या संस्थाना मंजूरी देणेबाबत मा. जिल्हाधिकारीसो, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 10/07/2019 रोजी दुपारी 12.30 वा. बैठक संपन्न झाली.
विना परवाना साहसी क्रिडा आयोजक हे क्रिडा प्रकाराचे आयोजन करताना अपघात होतात. सदरचे अपघात हे मुख्यत: अप्रशिक्षित कर्मचारी तसेच दुय्यम दर्जाचे साहीत्याचा वापर यांमुळे होत असतात. त्यामुळे साहसी क्रिडा प्रकारातील होणारे अपघात टाळण्यासाठी साहसी क्रिडा प्रकारातील आयोजन करीत असलेल्या संस्थांनाही सदरच्या बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. सदर बैठकीत साहसी क्रिडा प्रकारांच्या आयोजनाबाबत आणि सदरच्या संस्थांना नोंदणी करण्याबाबत सविस्तर सुचना देवुन शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला अध्यादेश देण्यात आला आहे. साहसी क्रिडा प्रकारातील संस्थांची रितसर नोंद, वापरण्यात येणाऱ्या साहीत्याची तज्ञांकडुन तपासणी, क्रिडा प्रकारात भाग घेणाऱ्या व्यक्तींचा विमा, स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच वनविभाग आणि पोलीस विभागाकडे नोंदणी या बाबी आवश्यक असल्याचे सदर बैठकीत सांगण्यात आले. साहसी क्रिडा प्रकाराचे आयोजन करणाऱ्या संस्थांनी या समितीकडे संस्थेची नोंदणी करणे अनिवार्य आहे. सदर बाबतच्या अधिक माहीतीसाठी मा. जिल्हा क्रिडा अधिकारी, पुणे़ किंवा प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे यांचेकडे संपर्क साधण्याचे आवाहन  प्रादेशिक व्यवस्थापक
तथा सदस्य सचिव श्री. दिपक हरणे यांनी केले आहे.