कोंडी सोडवण्यास वाहतूक पोलीस हतबल

689

संबधित विभागांच्या उदासीनतेमुळे समस्यांचा डोंगर; केवळ पोलीस विभागावर फोडले जाते खापर  

पुणे : प्रतिनिधी  

हाय वे ऑथरेटी व अन्य विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पुणे – नगर महामार्गावर असंख्य समस्यांचा सामना नागरिकांसह वाहनधारकांना करावा लागत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे तर अजूनच समस्यांत भर पडली आहे. महामार्गावर नाल्या अभावी ठिकठिकाणी साचलेले वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहे. कोंडी सोडवण्यासाठी लोणीकंद वाहतूक पोलिसांची मात्र दमछाक होत आहे. केवळ पोलीस विभागावर खापर फोडले जात असले तरी बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्या नागरिकांसह विविध विभाग देखील कोंडी निर्माण करण्यास मोठ्याप्रमाणावर जबाबदार असल्याचे वास्तव आहे.

सद्यस्थितीत वाघोली येथे पुणे – नगर महामार्गावर वाहतूक कोंडीने कहर केला आहे. ठीक ठीकांनी पडलेले खड्डे, महामार्गालगत असणाऱ्या दुकानांसमोर लागलेल्या अस्तव्यस्त दुचाकी व चारचाकी गाड्या, सायंकाळच्यावेळी प्रवाशी घेण्यासाठी रस्त्यामध्येच उभ्या असलेल्या खाजगी ट्रॅव्हल्स, विरुद्ध दिशेनी भरधाव येणारी वाहने या प्रकारामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. पोलीस विभागाकडून सातत्याने कारवाई केली जाते. तरीही वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असतांना दिसून येते. त्यातच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पीएमआरडीए आदि विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे समस्या वाढल्या आहेत. महामार्गावर पाणी साचत असून वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे तर महामार्गाची अजूनच गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.   

असून वळंबा नसून खोळंबा :

शिव छत्रपती प्रतिष्ठानच्या पाठपुराव्यानंतर वाघोली येथील अनेक चौकात सिग्नल सुरु करण्यात आले. सिग्नल सुरु झाल्यास काही प्रमाणात वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल असे वाटले होते. परंतु “असून वळंबा नसून खोळंबा” अशी अवस्था सिग्नलची झाली आहे.     

पुणे – नगर महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन अंतर्गत पंचवीस गावे येतात. यामध्ये काही गावे अतिसंवेदनशील तर काही गावे संवेदनशील आहेत. गंभीर गुन्हे, बंदोबस्त, न्यालयीन, अपघात अशा विविध कामकाजासाठी धावपळ करावी लागते. पोलीस स्टेशनला असलेले कमी पोलीस बळ आणि वाढता कामाचा व्याप, यामुळे पोलिसांना प्रचंड ताण सहन करावा लागतो. त्यातच नित्याची वाहतूक कोंडीची जबाबदारी पेलावी लागते. खरे तर महामार्गावर वाहतूक कोंडी व विविध समस्या निर्माण करण्यास संबधित विभाग जबाबदार असतांना केवळ पोलिसांनाच दोष देऊन त्यांच्यावर खापर फोडले जाते.

वाघोली येथे साईसत्यम या ठिकाणी महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना अंदाज येत नाही. त्यामुळे ते इतर ठिकाणाहून वाहन काढण्याचा प्रयत्नकरतात. अशावेळी अपघाताला निमंत्रण तर मिळतेच परंतु वाहतूक सुद्धा कोंडी होते. पोलिसांना कोंडी सोडवतांना मोठी कसरत करावी लागते. महामार्गावर ठीकठिकाणी पाणी साचलेले असून संबधित विभागाची उदासीनता जीवघेणी ठरू शकते – अण्णासाहेब टापरे (पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक शाखा, लोणीकंद)