टेमघर धरणाची गळती रोखण्यासाठी नियोजनबध्‍द प्रयत्‍न

667

मल्हार न्यूज, पुणे

पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चार धरणांपैकी टेमघर धरणाच्या गळती रोखण्‍याचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे, असे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी सांगितले. उर्वरीत10 टक्के गळती रोखण्याचे काम पुढील वर्षभरात केले जाणार आहे. त्यामुळे टेमघर धरणाची गळती 100 टक्के रोखण्यासाठी वर्षभराचा कालवधी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे म्हणाले, पुणे शहरासाठी खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या चार धरणातून पाणीसाठा केला जातो. मात्र, टेमघर धरणातून 2016 ला मोठ्या प्रमाणावर गळती झाली होती. यानंतर राज्य सरकारने धरणातील पाणी गळतीची गंभीर दखल घेत धरणाचे बांधकाम करणार्‍या तीन कंपन्यासह 22 अभियंताच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात आली. सध्या हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. धरण मजबूत करण्याच्या दृष्टीने आणि गळती रोखण्यासाठी राज्य सरकार मार्फत 100 कोटींची विशेष तरतूद करण्यात आली. त्यानुसार 2016 ते आज अखेर 80 कोटी रुपयांच्या तरतुदीमधून 90 टक्के गळती रोखण्यात यश आले आहे. आता उर्वरित 10 टक्के गळती रोखण्‍याच्‍या कामास वर्षभराचा कालावधी लागणार आहे. ते पुढे म्हणाले, देशात प्रथमच ग्राऊंटींग या तंत्रज्ञानाचा वापर करुन धरणाची गळती रोखण्यात आली आहे. या पुढील काळात देखील अशाच पद्धतीने गळती रोखण्यासाठी आम्ही तंत्रज्ञान वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, आता टेमघर धरणात यंदाच्या पावसाळ्यात 100 टक्के पाणीसाठा करणार असून पुणे शहराला मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

0000