क्रीडा शिक्षकाने एकतरी राष्ट्रीय खेळाडू घडवावा – विजय संतान

583

मल्हार न्यूज, पुणे

प्रत्येक क्रीडा शिक्षकाने राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील एकतरी खेळाडू घडविण्याचे उद्दीष्ट ठेवावे व त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी ‍ विजय संतान यांनी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, बारामतीच्या वतीने प्रतिवर्षी भारतीय खेळ महासंघ पुरस्कृत शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सन २०१९-२० या वर्षातील तालुका, जिल्हा, विभाग व राज्य स्पर्धांचे आयोजन व नियोजन करण्यासाठी तसेच ऑनलाईन प्रवेशिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वेबसाईट विषयी मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांच्या अध्यक्षतेखाली बारामती तालुकास्तरीय क्रीडा शिक्षकांच्या बैठकीचे आयोजन तालुका क्रीडा संकुल, माळेगाव येथे करण्यात आले होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, पुणे जिल्हा परिषद सदस्या रोहीणीताई तावरे, माळेगाव सह.साखर कारखान्याचे संचालक दिपक तावरे, क्रीडा अधिकारी राजेश बागुल, दादासाहेब देवकाते, शिवाजी कोळी, चनबस स्वामी, जालींदर आवारी, जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री.पाटोळे, बारामती तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खोमणे, प्रा.बी.यु.गायकवाड, मुळीक इ.मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जि.प.सदस्या सौ. तावरे यांनी गुरुपौणिमे निमित्त उपस्थितांना शुभेच्छा देताना आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये शिक्षकाचे मार्गदर्शन महत्वाचे असल्याचे सांगून क्रीडा शिक्षकांनी खेळातील नवीन नियम विद्यार्थ्यांना शिकवून त्यांच्या खेळातील सुधारणा कराव्यात असे सांगितले. सभापती भोसले यांनी बलशाही भारताचे निर्माणाकरीता क्रीडा शिक्षकाचे योगदान महत्वाचे असून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा.त्यांच्यामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले.
जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी गतवर्षीच्या कामाचा आढावा घेताना काही सुधारणा विषयी बाबी लक्षात येतात, त्यामुळे यावर्षीचे नियोजन करणे सोपे जाते. सध्या ऑनलाईन डेटा संपादीत करण्यात येत असल्याचे तसेच मागील कालावधीतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी केलेल्या खेळाडूंची यादी वेबसाईटवर टाकली असल्याचे सांगितले. क्रीडा शिक्षकांनी वैधता प्रमाणपत्राकरीता तात्काळ कार्यवाही करावी, काही कालावधीकरीताच व्यायाम न करता वर्षभर व्यायाम करावा असे सांगितले. तसेच यावर्षी तालुक्यामधून जास्तीत जास्त खेळाडूंचा सहभाग वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. तसेच प्रत्येक शिक्षकाने एकतरी राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होण्याकरीता प्रयत्न करावेत, असे सांगितले.क्रीडा संस्थांना ओपन जीमचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले.
या बैठकीचे आयोजनाबाबतची माहिती तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी प्रास्ताविकामध्ये दिली. सूत्रसंचालक प्रा.देवधर यांनी केले.
० ० ० ०