Thursday, March 20, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेपु.लं च्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त स्टँड अप कॉमेडी स्पर्धांचे आयोजन

पु.लं च्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त स्टँड अप कॉमेडी स्पर्धांचे आयोजन

मल्हार न्यूज,पुणे,

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून राज्य शासनामार्फत पुलंच्या जन्मशताब्दी निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. याच उपक्रमांर्गत स्टँड अप कॉमेडी स्पर्धांचे आयोजन राज्यात केले जाणार आहे. पुल यांच्या साहित्यावर आधारित स्टँड अप कॉमेडीची राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे.
मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांत ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्ये केंद्रावर पात्र ठरणाऱ्या निवडक विजेत्यांना स्पर्धेच्या अंतिम फेरीत सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील विनोदी कलावंतांचे टॅलेंट हंट करण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्ताने राज्य शासन करणार आहे. दि. १६जुलै रोजी नाशिक जिल्ह्यातून जिल्हास्तरीय फेऱ्यांना सुरुवात झाली असून, प्रत्येक केंद्रावरील विजेत्याला 20,000/- आणि उपविजेत्याला 15,000/- अशी रोख स्वरुपाची बक्षिसे देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 आणि दुपारी 3.00 ते सायंकाळी 7.00 या स्पर्धेचे आयोजन होणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपल्या कार्यक्रम स्थळाजवळील वेळापत्रकाप्रमाणे एक दिवस अगोदर 7506848055 या व्हॉट्सॲप क्रमांकावर 2 मिनिटांचे सादरीकरण चित्रित करून पाठवायचे आहे. यातून निवड करण्यात आलेल्या स्पर्धकाला केंद्रावर 5 ते 8 मिनिटे सादरीकरण करावयाचे आहे. या स्पर्धेचा सोहळा येत्या 25 ऑगस्ट रोजी पुणे येथील गणेश कला क्रिडा मंच येथे रंगणार आहे.
विनोद हा पुलंच्या साहित्याचा अविभाज्य भाग आहे. समाजातील माणसांच्या वृत्तींवर आपल्या खुमासदार शैलीत पुलं.नी कायम भाष्य केले. स्टँड अप कॉमेडी ही स्पर्धा देखिल अशाच स्वरुपाची होणार आहे. एखाद्या वृत्तीवर, माणसाच्या स्वभावावर दैनंदिन व्यवहारी जीवनात घडणाऱ्या प्रसंगांवर मिश्कील टिप्पणी करत त्यातील विनोद सर्वांसमोर आणण्याचा प्रकार अनेक स्टँड अप कॉमेडियन करतात. सध्या तरुणाईत हा प्रकार अत्यंत लोकप्रिय होत आहे याच धर्तीवर पुलंचे साहित्य अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचावे, यासाठी ही स्पर्धा सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित केली आहे. या स्पर्धेदरम्यान सर्व जिल्हा केंद्रावर पु.ल. जत्रोत्सवही आयोजित करण्यात येणार आहे. या माध्यमातून पुलंचे साहित्य, त्यांची भाषणे, त्यांचे कार्यक्रम अनुभवण्याची संधीही रसिकांना मिळणार आहे.
या संपूर्ण उपक्रमाचे प्रक्षेपण सोनी मराठी वाहिनीवरून केलेजाणार असून कलावंतांची कला महाराष्ट्रभर पोहोचावी, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील शहरी तसेच ग्रामीण भागातील विनोदी कलावंतांना राज्यस्तरीय व्यासपीठ देण्याच्या हेतूने ही स्पर्धा राबवण्यात येत आहे. या स्पर्धेस भरभरून प्रतिसाद देण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!