Sunday, April 27, 2025
Google search engine
Homeमुंबई/कोंकणमुंबईसायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक; महानिरीक्षक ब्रिजेश सिंह

सायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक; महानिरीक्षक ब्रिजेश सिंह

मल्हार न्यूज, मुंबई प्रतिनिधी

वाढत्या डिजिटल आर्थिक व्यवहारांमुळे सायबर गुन्हे वाढत आहेत. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तपास यंत्रणाही डिजिटल होणे आवश्यक आहे. त्या दृष्टिने महाराष्ट्र पोलीसांचे महाराष्ट्र सायबर सज्ज असून सायबर गुन्ह्यांच्या तपासामध्ये देशात महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र सायबरच्या वतीने राज्यातील सायबर सेलच्या नोडल अधिकारी/ कर्मचाऱ्यांसाठी महिला व बालकांसंबंधीच्या सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी सुरू केलेल्या सीसीपीडब्ल्यूसी या संकेतस्थळाच्या संबंधीच्या कार्यशाळेत श्री. सिंह बोलत होते. यावेळी महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक बाळसिंग रजपूत, सचिन पांडकर, पोलीस उपायुक्त श्री. खैरे आदी यावेळी उपस्थित होते. सीसीपीडब्ल्यूसीमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. महिला व बालकांसंबंधी विविध संकेतस्थळाच्या माध्यमातून घडणाऱ्या गुन्ह्याविरुद्ध आलेली तक्रार दाखल करून घेण्यासाठी केंद्र शासनाने सायबर क्राईम प्रिव्हेन्शन अग्नेस्ट वुमन अँड चाईल्ड (सीसीपीडब्ल्यूसी) या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. यासंकेतस्थळावरील तक्रारींची माहितीची दखल कशी घ्यायची, त्यासंबंधी योग्य ती कार्यवाही कशा प्रकारे करायची यासंबंधीचे हे मार्गदर्शन या कार्यशाळेत देण्यात आले.

श्री. सिंह म्हणाले, सध्या तिकिट बुकींगपासून ते जेवण मागविण्यापर्यंत सर्वच क्षेत्रात डिजिटल माध्यमांचा वापर वाढला आहे. त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ होत आहे. या गुन्ह्यांना भौगोलिक मर्यादा नसल्यामुळे हे गुन्हे सोडविण्यात गुंतागुंत वाढली आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांचा तपासही अत्याधुनिक डिजिटल साधनाच्या माध्यमातून करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सायबरने राज्यात सर्व जिल्ह्यामध्ये सायबर पोलीस ठाणी तसेच सायबर प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत. येथील कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले असून सर्व प्रयोगशाळात गुन्हे उकलण्यासाठी आवश्यक ते सॉफ्टवेअर व इतर यंत्रणा पुरविली आहे.

सीसीपीडब्ल्यूसी या संकेतस्थळावर आतापर्यंत फक्त महिला व बालकासंबंधीच्या सायबर गुन्ह्यांची तक्रार घेण्यात येत होती. मात्र, पुढील काळात सर्वच सायबर गुन्ह्यांची तक्रार नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टल (एनसीआरपी) संकेतस्थळाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. त्यामुळे सायबर पोलीसांची जबाबदारी वाढणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीसांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येत असल्याचेही श्री. सिंह यांनी सांगितले.

सीसीपीडब्ल्यूसी संकेतस्थळावर येणाऱ्या तक्रारीसंदर्भातील कार्यवाहीबद्दल सांगून श्री. राजपूत म्हणाले, इंटरनेटच्या माध्यमातून चाईल्ड पोर्नोग्राफी व महिलाविषयी अश्लिल माहितीविरुद्ध तक्रारी नोंदविण्यासाठी सीसीपीडब्ल्यूसी संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या तक्रारीवर तत्काळ कार्यवाही करणे आवश्यक असून या तक्रारींची माहिती रोजच्या रोज केंद्रीय गृह मंत्रालय तपासत असते. सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी आधुनिक साहित्यासह सायबर प्रयोगशाळा सज्ज आहे.

महिला व बालकासंबंधीच्या सायबर गुन्ह्यांच्या तक्रारीसाठी www.cybercrime.gov.in या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. या संकेतस्थळावर प्राप्त होणाऱ्या तक्रारीची दखल घेण्यात येते. यामध्ये बलात्कार, सामुहिक बलात्कार व चाईल्ड पोर्नोग्राफी याविषयीच्या तक्रारींवर कार्यवाही करण्यात येते. चोवीस तासाच्या आत या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्याकडे पाठविली जातात. त्यानंतर त्यावर संबंधित पोलीस ठाणे हे चोवीस तासात कार्यवाही करतात.

चाईल्ड पोर्नोग्राफी व महिलांविषयक सायबर तक्रारींसाठी हेल्पलाईन क्रमांक 155260 देण्यात आला असून त्यावर नागरिकांना तक्रारी करता येणार आहे.

यावेळी सहायक पोलीस निरीक्षक शिरिष भालेराव, पोलीस उपनिरीक्षक रविकांत भंडारी, संदीप पाटील, राजर्षी दुधाळे, पोलीस शिपाई विवेक सावंत यांनी या संकेतस्थळासंबंधी व तक्रारींवरील कार्यवाही संबंधी सादरीकरण केले. पोलीस उपनिरीक्षक रुपाली बोबडे यांनी प्रास्ताविक केले.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!