तनवीर बागवान,जालना
वॉचमनचे हात बांधून, मुख्य दरवाजा तोडून एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला. मात्र, व्यावसायिक आणि पोलीस प्रशासनाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे लुटारुंनी त्या घरातून पळ काढला. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास शहरातील मंठा चौफुली भागातील शीतलनगर भागात घडली. या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना शहरातील मंठा चौफुली भागातील शीतलनगर परिसरात बांधकाम व्यावसायिक गौतम मुनोद यांचे घर आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास मुनोद यांच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. घराच्या सुरक्षेसाठी असलेल्या वॉचमनचे हात बांधून त्याला धमकी देत मुख्य दरवाजा तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. मुख्य दरवाजा आणि बेडरुमचा दरवाजा तोडताना झालेल्या आवाजाने मुनोद यांना जाग आली. त्यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. तसेच शेजारी आणि नातेवाईकांनाही भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. मुदोन यांनी दक्षतेने पोलिसांशी संपर्क साधला. काही मिनिटांतच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, नागरिक जागे झाल्याची आणि पोलीस येत असल्याची चाहूल लागताच चोरटे पळाले. मात्र, सीसीटीव्हीचा डीव्हीआर लंपास केला.