कोटी रुपयांच्या उलाढालीने अंतिम विजेता क्लब चालकच !!!!

702

खेळणाऱ्यांना पुरवल्या जातात लग्झरी सुविधा 

वाघोली : प्रतिनिधी

पूर्व हवेलीमध्ये चालू असलेल्या क्लबमध्ये कोटी रुपयांची उलाढाल होतअसल्याचे चित्र दिसून येत आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आदि ठिकाणांसह खेळायला येणाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे या धंद्याना उभारी मिळाली आहे. एक डाव आठ ते दहा लाखाचा असल्यामुळे खेळणाऱ्यांना विशेष लग्झरी सेवा पुरवली जाते. याकडे संबधित विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे बिनधास्तपणे पूर्व हवेलीत क्लब चालू आहेत.

पूर्व हवेलीत अवैध वाहतूक, गांजा विक्री, गुटखा विक्री, बेकायदा दारू विक्री, हातभट्टीची दारू आदि अवैध धंद्यांवर कारवाई केली जाते. या छोट्या अवैध धंद्यांविरोधात कारवाई करून फार मोठा दिखावा पोलीस प्रशासनाकडून केला जातो. मात्र क्लबमधून कोटी रुपयांची उलाढाल होत असतांना क्लब चालकांवर कारवाई करण्यास ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष केले जात आहे. पोलिसांकडून इतर अवैध धंद्यांविरोधात लाखो रुपयांची कारवाई केली जाते. खरे तर क्लब चालकांवर कारवाई केल्यास इतर धंद्यापेक्षा ही कारवाई मोठी ठरू शकते.

क्लबमध्ये एक डाव ८ ते १० लाखांचा असून दिवसरात्र असे अनेक डाव चालवले जातात. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिकआदींसह विविध ठिकाणांहून खेळण्यासाठी येणाऱ्यांना जेवण, सिगारेट, दारू आदींसह लग्झरी सेवा पुरवल्या जातात. महत्वाच्या ठिकाणांसह माळरानावर खुल्या मैदानात सुद्धा डाव रंगत असतांना संबधित विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

कोटी रुपयांची रोकड :

डाव रंगल्यानंतर कोटी रुपयांची रोकड हाताळली जाते. पैसे नसले तर गळ्यातील चैन, हातातील ब्रासलेट याची बोली लावली जाते. वेळप्रसंगी गाड्या, शेती घेतली जाते. रिझर्व बँकेने रोख रक्कमेबाबत बंधने घातली असतांना कोटी रुपयांची रोकड वापरली जाते.

खेळणाऱ्यांमध्ये हारजीत असली तरी क्लब चालवणारा मात्र एकमेव अंतिम विजेता ठरतो. कोटी रुपयांची उधळपट्टी या खेळामधून होत असल्यामुळे अनेकांचे संसार उधवस्त होत असतानाचे चित्र दिसून येत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोर-पाटील यांना संपर्क केला असता कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.