जीवनावश्यक सेवा पुरविण्याबरोबरच पुनर्वसनाच्या कामाला विशेष प्राधान्य -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

725

5 हजारांच्या रोख मदतीचे उद्यापासून वाटप; स्वच्छतेच्या कामांना सुरूवात

पुणे प्रतिनिधी: पुणे विभागातील पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीतील पूर झपाट्याने ओसरत असला तरी अजूनही तेथील नद्या धोकापातळीच्या वरुन वाहत आहेत. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरू झाली असून सध्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला प्राधान्य देण्यात येत आहे. ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांसह पूलांची कामे करून त्यांच्याशी संपर्क पूर्ववत प्रस्थापित करण्याचे काम सुरू आहे. बाधीत ग्रामीण भागाला पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छतेसह पशूवैद्यकीय सेवा विशेष प्राधान्याने देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिली. तसेच जादा दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे विभागातील पूरस्थिती, बचाव व मदत कार्याबाबत माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. म्हैसेकर बोलत होते.
डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात पावसाचा जोर कमी झाला असून अलमट्टी धरणातून 5 लाख 70 हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, मात्र धरणात 6 लाख 11 हजार क्युसेक एवढी पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे पूर पातळी कमी होण्यास वेळ लागत आहे. सांगली आणि कोल्हापूरच्या नद्या अजूनही धोका पातळीच्यावर सरासरी पाच फूट वाहत आहेत. विभागातील 147 रस्ते बंद असून 66 पूल पाण्याखाली आहेत. कोल्हापूरशी रस्ते वाहतूक सुरु झाली असून पुणे-बंगळुरू महामार्गावरुन जीवनावश्यक सेवेची वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांनाच सोडण्यात येत आहे.
*95 हजार 206 कुटंबांचे स्थलांतर*
पुणे विभागातील 584 बाधीत गावातील 95 हजार 206 कुटुंबातील एकूण 4 लाख 74 हजार 226 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करून त्यांची 596 निवारा केंद्रात त्यांची सोय केलेली आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 1 लाख 85 हजार 855, कोल्हापूर जिल्ह्यातील 2 लाख 47 हजार 678, सातारा जिल्ह्यातील 10 हजार 755, सोलापूर जिल्ह्यातील 29 हजार 777 तर पुणे जिल्ह्यातील केवळ 161 लोकांचा समावेश आहे. पुरामुळे विभागात एकूण 43 व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 21 लोक, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी 7 लोक तर सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. सांगली शहरात रविवारी रात्री उशीरा दोन पुरूषांचे मृतदेह अढळून आले असून अद्यापी त्यांची ओळख पटलेली नाही.
*वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दपातळीवर*
महावितरणच्या माध्यमातून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या पुरामुळे 30 उपकेंद्रातील 412 वाहिन्या, 9 हजार 489 रोहित्रे व 3 लाख 29 हजार 603 ग्राहक बाधीत झाले आहेत. त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. आतापर्यंत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील 1 लाख 72 हजार 921 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. सध्या शेतीला पाण्याची आवश्यकता नसल्याने कृषक रोहित्रांऐवजी घरगुती वापरांसह इतर प्रकारच्या बंद रोहित्राच्या दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बंद असणारा वीज पुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी महावितरणच्या बाहेरील पथके बाधीत क्षेत्रात पाहोचली असून त्यांनी काम सुरु केले आहे.
*313 एटीममध्ये 25 कोटींचा भरणा*
पुरामुळे बाधीत झालेल्या कुटुंबांकडील पासबुक, चेकबुक खराब झाले असल्याचे गृहीत धरून मदत देताना बँकांनी युआयडीच्या माध्यमातून बाधीतांना पैसे देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच शासनाकडून देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानापैकी 5 हजार रुपयांची मदत प्रत्येक कुटंबांना मंगळवार पासून रोख स्वरूपात देण्यास सुरूवात करण्यात येणार आहे. तर उर्वरीत रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. तसेच बाधित क्षेत्रातील 469 एटीएम पैकी बंद एटीमए यंत्रे दुरूस्त करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. सध्या 313 एटीएम मशिन सुरळीत करण्यात यश आले असून त्यांच्यामध्ये 25 कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. तसेच एसबीआय व ट्रेझरी बँकांनी जिल्हा मध्यवर्ती बँकांना तातडीने रक्कम उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही मृत जनावरांचे स्वतंत्र शवविच्छेदन न करता संबंधित बाधीतांना वीमा रक्कम मंजूर करण्याच्या सूचना वीमा कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात येणार नाही.
*पाणीपुरवठा योजनांच्या दुरूस्त्यांवर भर*
पुणे विभागातील बाधीत झालेल्या पाणी पुरवठा योजना प्राधान्याने दुरूस्त करून पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार काम सुरू आहे. सध्या मीरज शहराच्या पाणी पुरवठा योजनेतून सांगली शहराला पाणी पुरवठा करण्यात येत आहे तर कोल्हापूर शहराला शिवाजी विद्यापीठाच्या पंपींग स्टेशनवरून पाणी पुरवठा केला जात आहे. कोल्हापूर आणि सांगली शहरांचा पाणीपुरवठा दोन दिवसात सुरू होईल. तसेच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाणी पुरवठा योजना प्राधान्याने दुरूस्त करण्यात येणार आहेत.
*स्वच्छतेच्या कामासाठी ‘बीएमसी’ची मदत*
पुरामुळे बाधीत झालेल्या ठिकाणी कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरू नयेत म्हणून स्वच्छतेची कामे सुरू करण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी पाणी ओसरले आहे त्याठिकाणी स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापनासाठी शॉर्ट टेंडर काढण्यात येणार असून येत्या चार ते पाच दिवसात ती प्रक्रीया पूर्ण करण्यात येईल. मुंबई महानगरपालिकेचे पथक दाखल झाले असून त्यांनी मनुष्यबळासह यांत्रिक साहित्य पुरविले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्यावतीने स्वच्छता कार्मचाऱ्यांची टीम व साहित्य बाधीत भागात रवाना करण्यात आले आहे.
*मदतीचे स्टँडर्ड किट…*
सामाजिक संस्थांसह वैयक्तिक लोकांकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा मोठा ओघ सुरू आहे. मात्र मदतीच्या माध्यमातून देण्यात येणारे साहित्य पूरग्रस्तांपर्यंत योग्य रित्या वेळत पोहोचविण्यासाठी शासनाच्यावतीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अनेक संस्था, सामाजिक संस्था मदतीचे साहित्य आणून देत आहेत. मात्र ते साहित्य तातडीने पूरग्रस्तांना उपयोगी पडावे यासाठी शासनाच्यावतीने मदतीचे एक स्टँडर्ड कीट तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये टूथपेस्ट, साबणापासून तयार स्वयंपाकाचे सर्व साहित्य असणार आहे. एका किट मधील शिधा एका कुटुंबाला किमान एक आठवडा पुरेल इतका आहे, लागल्यास अतिरिक्त शीधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा प्रकारे मदतीचे स्टँडर्ड किट तयार करून देण्याचे आवाहन सामाजिक संस्थांना करण्यात आल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
****