भीमाशंकरला एमटीडीसी पर्यटक निवासाचे उद्घाटन

691

पुणे प्रतिनिधी,

भीमाशंकर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) भव्य पर्यटक निवास पर्यटकांच्या सेवेत रुजू केले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौद्रे, विश्वस्त सुनील देशमुख, प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे वरिष्ठ व्यवस्थापिका क्षिप्रा बोरा यांच्‍या उपस्थितीत या पर्यटक निवासाचे उद्घाटन करण्यात आले.

सर्व सोयींनी युक्त अशा या दुमजली पर्यटक निवासात तळमजल्यावर 30 डीलक्‍स रूम, 3 व्‍हीआयपी सूट, भव्य रेस्टॉरंट असून पहिल्या मजल्यावर 48 डीलक्स रूम आहेत. या ठिकाणी 8 लोकनिवास असून 2 कॉन्फरन्स हॉल आहेत. कॉन्फरन्स हॉल प्रोजेक्टरसह सर्वसोयीनी युक्त असून या ठिकाणी 45 कव्‍हर्ड कार पार्किंग तयार आहेत. वाहन चालकांसाठी स्वतंत्र सोय आहे. पर्यटक निवासातील रेस्टॉरंटमध्ये स्वादिष्ट शाकाहारी भोजनाची व्यवस्था असून येथील खोल्या परवडणाऱ्या दरात पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात येत आहेत, अशी माहिती प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी दिली