स्वप्नपूर्तीचा प्रवास ‘मिशन मंगल’ 

1703

भूपाल पंडित, पुणे 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) ने मंगळ ग्रहावर आपला उपग्रह पाठवून अंतराळ संशोधनात दैदिप्यमान यश मिळविले. याच यशस्वी मोहिमेची कथा अक्षयकुमारच्या बहुचर्चित ‘मिशन मंगल’ या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. तांत्रिक विषयाची क्लिष्टता टाळून अतिशय साध्या सोप्या पद्धतिने ही मोहीम उलगडण्यात आल्याने सामान्य प्रेक्षकांना ‘मिशन मंगल’ भावतो.

‘मिशन मंगल’ ची कथा भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित आहे. २४ सप्टेंबर २०१४ ला इस्त्रोच्या महिला वैज्ञानिकांनी मंगळ मोहिमेसाठी उपग्रह प्रेक्षापित केला होता. ज्यानंतर भारत असा पहिला देश ठरला, ज्याने इतक्या कमी पैशात आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम सफल करून दाखवली. चित्रपट २०१० पासून सुरु होतो. इस्त्रोचे प्रसिद्ध वैज्ञानिक आणि मिशन मंगलचे डायरेक्टर राकेश धवन (अक्षय कुमार) इस्त्रोची वैज्ञानिक आणि प्रोजेक्ट डायरेक्टर तारा शिंदे (विद्या बालन) सोबत मिळून जीएसएलवी सी-३९ नावाच्या मिशनअंतर्गत एक रॉकेच लॉन्च करतात. मात्र, हे मिशन अपयशी ठरतं. ज्यानंतर राकेश आणि ताराला इस्त्रोच्या रखडलेल्या मंगळ मोहीम  विभागात पाठवलं जातं. तिथे ताराच्या डोक्यात मिशन मंगलची कल्पना येते. या प्रोजेक्टसाठी राकेश आणि तारा इस्त्रो हेड विक्रम गोखले यांच्याशी बातचीत करतात. मात्र, यात मोठा अडथळा असतो, तो आर्थिक तरतूदआणि नासामधून बोलवलं गेलेल्या दिलीप ताहिल यांचा विरोध.राकेशच्या आग्रहामुळे आणि कमिटमेंटमुळे मोहिमेला  परवानगी तर दिली जाते. मात्र, यासाठी त्याला ऐका गांधी (सोनाक्षी सिन्हा), कृतिका अग्रवाल (तापसी पन्नू), वर्षा पिल्ले (नित्या मेनन), परमेश्वर नायडू (शरमन जोशी) आणि एचजी दत्तात्रेय (अनंत अय्यर) यांसारख्या नवोदित वैज्ञानिकांची टीम दिली जाते. या सर्वांची विचारसरणी आणि वैयक्तिक आयुष्यातील समस्या यांमुळे यातील कोणीही हे मिशन साध्य करण्यासाठी विश्वासू नसतं. तारा शिंदे त्यांची विचारसरणी बदलून त्यांना मिशन मंगलसाठी संपूर्ण मनापासून काम करण्यासाठी प्रेरित करते आणि पुढे हा प्रवास कसा होतो हे जाणून घेण्यासाठी ‘मिशन मंगल’ बघायला हवा.

जगन शक्ती यांनी ‘मिशन मंगल’ च्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. एका ऐतिहासिक घटनेवर आधारित या चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकण्यात ते यशस्वी ठरले आहेत. मात्र त्यांनी जी कथासांगितली आहे ती प्रत्यक्षात घडताना खूप कठीण अशी होती. इथे मात्र ती अतिशय हलक्याफुलक्या अंदाजात मांडण्यात आली आहे, यावर थोडा विचार होणे आवश्यक होते असे वाटते, मोहीम सुरु झाल्या नंतर  काहीसा इतर गोष्टींमध्ये पण खूप जास्त रेंगाळतो. चित्रपटातील डायलॉग प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर केवळ हास्य न आणता प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्यास भाग पाडतात. वैज्ञानिकांच्या घरातील वातावरण थोडे कमी करून प्रत्यक्ष मोहीम अधिक उलगडण्यात आली असती तर चित्रपता अधिक प्रभावी बनला असता.

कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर विद्या बालन जबरदस्त अभिनय करतेच. तिचा अगदी सहज वावर आणि मोकळेपण यामुळे ही मोहीम अधिक चमकदार बनली आहे. तापसी पन्नु, कीर्ती कुल्हारी, सोनाक्षी सिन्हा आणि निथया मेनन या प्रत्येकीची वेगळी स्टाईल, प्रत्येकीच्या वेगळ्या तऱ्हा, हे सगळं खूप छान जुळून आलेलं आहे. अक्षय कुमार आणि देशभक्ती असे एक खास समीकरण अलीकडच्या काळात निर्माण झाके आहे ते अर्थात इथेही कायम आहे.  शर्मन जोशी, विक्रम गोखले या सगळ्या मोहिमेलाला खूप छान हातभार लावतात.

‘मिशा मंगल’ बद्दल थोडक्यात सांगायचे तर चित्रपटाचा विषय उत्तम आहे, पटकथा संवाद या बाजू भक्कम आहेत, अवघड विषय सोपा करून सांगणाऱ्या या चित्रपटातील गाणी कथेला धरून आहेत. चित्रपटाची तांत्रिक बाजू भक्कम आहे. हा चित्रपट आपल्याला एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होण्याची संधी देतो, यामुळे बघायला हरकत नाही.

चित्रपट – मिशन मंगल

निर्मिती –  केप ऑफ गुड फिल्म, होप प्रॉडक्शन्स, फॉक्स स्टार स्टुडिओ

दिग्दर्शक –  जगन शक्ती

संगीत – अमित त्रिवेदी, तनिष्क बागची

कलाकार – अक्षय कुमार, विद्या बालन, शर्मन जोशी, कीर्ती कुल्हारी, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, निथ्या मेनन, विक्रम गोखले.

 

रेटिंग – ***

–    भूपाल पंडित

pbhupal358@gmail.com