राज ठाकरेंना ईडीची नोटिस आल्याने मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या

1226

पुणे प्रतिनिधी,

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडी नोटीस पाठवल्याच्या कारणामुळे ठाण्यातील मनसे कार्यकर्ता प्रवीण चौघुले याने आत्महत्या केली आहे. मंगळवारी 20 ऑगस्टला रात्री उशिराही ही घटना घडली आहे. प्रवीण हा मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांचा जवळचा होता.

प्रवीण हा ठाण्यातील विटावा भागात राहत होता. “राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आली आहे. त्यामुळे त्यांना चौकशीला सामोरे जावं लागणार आहे. यामुळे मी दु:खावलो असून आत्महत्या करतोय,” असं प्रवीणने त्याच्या मित्रांना आत्महत्येपूर्वी सांगितले होते. त्यानंतर त्याने स्वत:ला पेटवून घेतले. त्याने आत्महत्या केल्याचे कळताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचा मृतदेह कळव्यातील शिवाजी रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण हा ठाण्यातील कट्टर मनसैनिक होता. मनसेच्या अनेक कार्यक्रमात, मोर्चा किंवा आंदोलनात प्रवीण सहभागी असायचा. प्रत्येक मोर्चात प्रविण मनसेचा झेंडा त्याच्या शरीरावर रंगवायचा. तसेच स्थानिक नेत्यांच्याही तो फार जवळचा होता. त्याने फेसबुकवर मनसेच्या नेत्यांसोबत फोटो पोस्ट केले आहेत. त्याच्या आत्महत्येमुळे मनसैनिकांना फार मोठा धक्का बसला आहे.