पुणे प्रतिनिधी,
महाराष्ट्राचा स्टाईल आयकॉन असलेला अभिनेता अंकुश चौधरी एक हटके विषय घेउन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाच्या दिवाळीत अंकुश बॉक्स ऑफिसवर धमाका करायला येणार असून यावेळी तो एकटा नव्हे तर चक्क “ट्रिपल सीट’ येणार आहे. संकेत प्रकाश पावसे दिग्दर्शित ‘ट्रिपल सीट’ या मराठी चित्रपटाची निर्मिती अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एंटरटेनमेंटस, अहमदनगर फिल्म कंपनी यांनी केली आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मिडीयावर लाँच करण्यात आले आहे.
नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया यांची निर्मिती असलेल्या ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटाच्या पोस्टरवर मध्यभागी बासरी हातात धरलेल्या श्रीकृष्णाच्या पोझमध्ये अंकुश चौधरी दिसत असून त्याच्या दोन्ही बाजूला दोन अभिनेत्री उभ्या असलेल्या दिसतात. सोबत या चित्रपटाला ‘वायरलेस प्रेमाची गोष्ट’ अशी टॅगलाईन असल्याने हा चित्रपट एकरोमॅंटीक कथानक घेउन येत असल्याचे दिसत असले तरी ही गोष्ट नक्की कुणाच्या प्रेमाची आहे? पोस्टरमध्ये असलेल्या त्या दोघी नक्की कोण आहेत? याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे.
‘ट्रिपल सीट’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि क्रिएटीव्ह दिग्दर्शन अॅड. अभिजित अरविंद दळवी याचे असून सहनिर्माता स्वप्नील संजय मुनोत आणि सहाय्यक निर्माता अॅड. पुष्कर श्रीपाद तांबोळी आहेत. चित्रपटाला अविनाश – विश्वजित यांचे संगीत आणि पार्श्वसंगीत लाभले आहे, तर गुरु ठाकूर, मंदार चोळकर, अश्विनी शेंडे, विश्वजित जोशी यांची गीते आहेत. संतोष सखंद यांचे कलादिग्दर्शन असून पुष्पांक गावडे डीओपी आहेत. मयूर हरदास संकलक तर शार्दूलमोहन मोहिते आणि स्वप्निल कोरे हे कार्यकारी निर्माते आहेत. वेशभूषा मयुरी मुनोत आणि मेकअप अतुल सिधये यांनी केले आहे. तगडी स्टारकास्ट, अनुभवी तंत्रज्ञ असलेला ‘ट्रिपल सीट’ हा मराठी चित्रपट येत्या २४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.