कोरोना आणि पुणे जिल्‍हा

1162

जगभरात कोवीड-19 (कोरोना) विषाणूचा संसर्ग सुरु झाल्‍यानंतर महाराष्‍ट्रातही आवश्‍यक ती खबरदारी घेण्‍यास सुरुवात झाली. पुण्‍यासह मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या महानगरातील शासकीय यंत्रणा सज्‍ज झाल्‍या. पुण्‍यात आंतरराष्‍ट्रीय विमान सेवा असल्‍याने येथे कोरोना संसर्गाचा धोका होताच. त्‍यामुळे पुणे महानगरपालिकेकडून नायडू रुग्‍णालयाच्‍या तयारीसाठी 26 फेब्रुवारी पासून कामाला सुरुवात झाली. 6 मार्च रोजी नायडू रुग्‍णालय सर्व तयारीनिशी सज्‍ज झाले होते. सर्व डॉक्‍टर्स, परिचारिका व संबंधित कर्मचा-यांचे कोव्‍हीड-19 संबंधित प्रशिक्षण झाले. कोरोनाच्‍या जनजागृतीसाठी आवश्‍यक ते साहित्‍य तयार करुन त्‍याचे वितरण करण्‍यात आले. परदेशी प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्‍यास सुरुवात करण्‍यात आली. आवश्‍यकतेनुसार संस्‍थात्‍मक विलगीकरणाचीही सोय उपलब्‍ध करण्‍यात आली.

पुणे जिल्‍ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण 9 मार्च 2020 मध्‍ये नायडू रुग्‍णलयात भरती करण्‍यात आला. हा रुग्‍ण दुबई व आबुधाबी यात्रा करुन मुंबई मार्गे पुण्‍यात आला होता. तो व त्‍याचे 17 सहप्रवासी प्रामुख्‍याने परदेश प्रवासगमन केलेले व मुंबई विमानतळावर उतरुन पुण्‍यात आले होते. यापैकी 9 व्‍यक्‍ती कोरोनाबाधित होत्‍या. त्‍यांना नायडू रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले. 9 मार्च ते 31 मार्च 2020 पर्यंत एकूण 48 रुग्‍ण होते. जिल्‍ह्यातील 190 व्‍यक्‍ती दिल्‍ली येथील निजामुद्दीन मरकज कार्यक्रमात 4 एप्रिलनंतर सहभागी झाल्‍या होत्‍या. यापैकी 181 व्‍यक्‍तींचा पाठपुरावा करण्‍यात आला आणि त्‍यांचे संस्‍थात्‍मक विलगीकरण करण्‍यात आले. 114 व्‍यक्‍तींची चाचणी करण्‍यात आली त्‍यापैकी 4 व्‍यक्‍तींना कोरोनाची लागण झाल्‍याचे निष्‍पन्‍न झाले. मरकज कार्यक्रमातून आलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या पाठपुराव्‍यापासून त्‍यांना रुग्‍णालयात भरती करण्‍याच्‍या दरम्‍यान त्‍यांचा अनेक लोकांशी संपर्क आला होता. या संपर्कातील 59 व्‍यक्‍तींचा पाठपुरावा करुन त्‍यांचीही तपासणी करण्‍यात आली. 9 मार्च ते 2 एप्रिल पर्यंत रुग्‍ण संख्‍येत प्रतिदिन 1 अंकी वाढ होती. 2 एप्रिल ते 22 एप्रिल या काळात दोन अंकी वाढ आणि 23 एप्रिलपासून प्रतिदिन 3 अंकी वाढ होत आहे.

साधारणपणे 7 मे पासून कोरोनाचा संसर्ग पुणे शहरातील दाट लोकसंख्‍या असलेल्‍या भागात होण्‍यास सुरुवात झाली. प्रामुख्‍याने ढोले पाटील रोड, भवानी पेठ, येरवडा, कसबा-विश्रामबागवाडा आणि शिवाजीनगर या वार्डामध्‍ये मोठ्या प्रमाणामध्‍ये संसर्ग दिसून आला. 15 पैकी 5 वार्डात एकूण रुग्‍णांच्‍या 71 टक्‍के रुग्‍ण होते. या वार्डातील मुख्‍यत: ताडीवाला रोड, येरवडा, खडकमाळ, नवी पेठ, कसबा पेठ या प्रभागामध्‍ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रसार झाला. 41 प्रभागापैकी 8 प्रभागात एकूण रुग्‍णांच्‍या 65 टक्‍के रुग्‍ण होते. या दाट लोकवस्‍तीच्‍या भागामध्‍ये सामाजिक अंतर, मास्क वापराचा अभाव, लवकर तपासणीस येण्‍यास अल्‍प प्रतिसाद या सारख्‍या कारणांमुळे आजाराचे प्रमाण वाढले.

विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महा‍पालिकेचे आयुक्‍त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्‍यासह पोलीस विभाग, आरोग्‍य विभाग आणि इतर प्रशासकीय यंत्रणा समन्‍वयाने काम करीत आहे. कोरोनाच्‍या संसर्गास आळा घालण्‍यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाय योजण्‍यात आले. शासनामार्फत नियुक्‍त वरिष्‍ठ अधिका-यांना पुणे महानगरपालिकेतील विविध भागात विशेष जबाबदारी देण्‍यात आली. प्रतिबंधित क्षेत्रातील दैनंदिन सर्वेक्षण व सहवासित पाठपुराव्‍याच्‍या माध्‍यमातून कोरोनासदृश्‍य लक्षणे असलेल्‍या व्‍यक्‍तींची ओळख आणि गरजेनुसार रुग्‍णालयात जाण्‍याचा सल्‍ला देण्‍यात आला. कोरोनासदृश्‍य लक्षणे असलेल्‍या व्‍यक्‍तींचे नमुने मोठ्या प्रमाणात संकलित करुन तपासणी करण्‍यात आली. कोरोना नमुने तपासणी प्रयोगशाळांचे सक्षमीकरण करण्‍यात आले. बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्‍णालय येथे स्‍वतंत्र कोवीड-19 रुग्‍णालयाची स्‍थापना करण्‍यात आली. डॉ. दिलीप कदम यांच्‍या अध्‍यक्षतेखाली गंभीर रुग्‍ण उपचार पध्‍दती सुचविण्‍यासाठी कृती दलाची स्‍थापना करण्‍यात आली. तज्ञ डॉक्‍टरांच्‍या शिफारशीनुसार गंभीर व अति गंभीर रुग्‍ण व्‍यवस्‍थापन प्रोटोकॉल, औषध प्रोटोकॉलसुचविण्‍यात आला असून त्‍याचा वापर करण्‍यात येत आहे. आयुष उपचारांसाठी डॉ. तात्‍याराव लहाने यांच्‍या अध्‍यक्षतेखाली टास्‍क फोर्स स्‍थापन करण्‍यात आला होता. त्‍यांनी जनतेची प्रतिकारशक्‍ती वाढविणे, आयुर्वेद, योगा, युनानी, सिध्‍दा, होमिओपॅथी उपचार पध्‍दतींचा अवलंब करण्‍याची शिफारस केली.

पुणे जिल्‍ह्यातील खाजगी रुग्‍णालयांचे कोवीड-19 उपचारासाठी अधिग्रहण करण्‍यात आले. डॉक्‍टर व रुग्‍णालयातील इतर स्‍टाफसाठी आवश्‍यक साधनसामुग्रीचा मुबलक प्रमाणात पुरवठा करण्‍यात आला. जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, ससून यांच्‍याकडे एन-95 मास्‍क, पीपीई कीट, त्रिस्‍तरीय मास्‍क, हायड्रोक्‍लारोक्‍वीन गोळ्या, असिलटॅमिहिर गोळ्या, अजिथ्रोमायसिन गोळ्या, लोपीनावीर गोळ्या या औषधी व साधनसामुग्रीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.

कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी आवश्‍यक ती उपाययोजना करण्‍यासाठी शासनामार्फत अतिरिक्‍त अधिकारी नियुक्‍त करण्‍यात आले. पुणे महापालिकेसाठी अतिरिक्‍त मुख्‍य सचिव(महसूल) नितीन करीर, साखर आयुक्‍त सौरभ राव, सहकार आयुक्‍त अनिल कवडे, पशुसंवर्धन आयुक्‍त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक कौस्‍तुभ दिवेगावकर, पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी प्रधान सचिव (नगरविकास) महेश पाठक तर ससून प्रशासनासाठी जमाबंदी आयुक्‍त एस. चोक्‍कलिंगम यांच्‍यावर जबाबदारी सोपविण्‍यात आली.

पुणे विभागीय आयुक्‍त स्‍तरावरही अधिका-यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. पशुसंवर्धन आयुक्‍त सचिंद्र प्रताप सिंग यांच्‍याकडे रुग्‍णालय व अतिदक्षता विभाग व्‍यवस्‍थापन, पुणे महानगर विकास प्राधीकरणाचे आयुक्‍त विक्रमकुमार यांच्‍याकडे अलगीकरण (आयसोलेशन) कक्ष व्‍यवस्‍थापन, शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांच्‍याकडे विलगीकरण (क्‍वारंटाईन) सुविधांचे व्‍यवस्‍थापन व अतिरिक्‍त विलगीकरण सुविधा निर्माण करणे, कृषी आयुक्‍त सुहास दिवसे यांच्‍याकडे जीवनावश्‍यक वस्‍तूंची उपलब्‍धता, पीएमपीएमएल च्‍या संचालक नयना गुंडे यांच्‍याकडे वाहतूक व्‍यवस्‍थापन, अपंग कल्‍याण आयुक्‍त प्रेरणा देशभ्रतार यांच्‍याकडे रेशन व इंधन पुरवठा, मृद व जलसंधारणचे व्‍यवस्‍थापकीय संचालक ऋषिकेश यशोद यांच्‍याकडे अन्‍न व औषधी, वैद्यकीय साधने व इतर जीवनावश्‍यक वस्‍तूंचा पुरवठा याबाबत जबाबदारी सोपविण्‍यात आली आहे. या व्‍यतिरिक्‍त अतिरिक्‍त-उप जिल्‍हाधिका-यांची शीर्ष अधिकारी म्‍हणून नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे.

कोरोनाबाधित व्‍यक्‍तींसाठी विलगीकरण 314 उपलब्‍ध सुविधा असून यात 41 हजार 384 खाटांची सोय आहे. अलगीकरणासाठी 71 उपलब्‍ध सुविधा असून 10 हजार 780 खाटांची सोय आहे. पुणे जिल्‍ह्यात कोरोना नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळा निश्चित करण्‍यात आल्या आहेत. ए.एफ.एम.सी., बी.जे.एम.सी., कमांड हॉस्‍पीटल, नारी लॅब, एन.सी.सी.एस., एनआयव्‍ही लॅब, आय.आर.एल., ए.जी. डायग्‍नोस्‍टीक, गेनेपथ डायग्‍नोस्‍टीक, कृष्‍णा लॅब, मेट्रोपॉलीस गोल्‍वीकर, रुबी हॉल क्लिनीक, सह्याद्री लॅब, सब अर्बन लॅब, थामोकेअर लॅब या प्रयोगशाळांमध्‍ये 3982 इतकी तपासणी क्षमता असून दैनंदिन तपासणी 2507 इतकी आहे. तपासणीसाठी येणारे नमुने हे तपासणी क्षमतेपेक्षा कमी असून सद्यस्थितीत तपासणीसाठी अडचण येत नाही. सर्व प्रयोगशाळांमध्‍ये तपासणीसाठी गोळा होणा-या नमुन्‍यांची संबंधित प्रयोगशाळेकडून तपासणी करण्‍यात येत आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनस्‍तरावरुन वेळोवेळी टाळेबंदी (लॉकडाऊन) घोषित करण्‍यात आली. पहिला टप्‍पा 25 मार्च ते 14 एप्रिल 2020, दुसरा टप्‍पा 15 एप्रिल ते 3 मे 2020, तिसरा टप्‍पा 4 मे ते 17 मे 2020 आणि चौथा टप्‍पा 18 मे ते 31 मे 2020 असा आहे. टाळेबंदीच्‍या चौथ्‍या टप्‍प्‍यामध्‍ये प्रतिबंधीत क्षेत्राबाहेर उद्योग भौतिक अंतर ठेवून सुरु करण्‍यात आले आहेत. कोरोनाच्‍या अनुषंगाने मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही व्हिडीओ कॉन्फरन्‍सिंगद्वारे 16 मार्च, 20 मार्च, 23 मार्च, 26 मार्च, 5 एप्रिल, 12 एप्रिल, 19 एप्रिल, 26 एप्रिल, 13 मे, 21 मे असा नियमित आढावा घेतला. उप मुख्‍यमंत्री आणि पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही 1 एप्रिल, 11 एप्रिल, 18 एप्रिल, 24 एप्रिल, 1 मे, 8 मे, 15 मे, 22 मे रोजी लोकप्रतिनिधी तसेच संबंधित अधिका-यांच्‍या बैठका घेवून वेळोवेळी आवश्‍यक त्‍या सूचना दिल्‍या.

पुणे जिल्‍ह्यासाठी कोरोना मुकाबल्‍याकरिता एकूण 23 कोटी 40 लक्ष रुपयांचा निधी वितरित करण्‍यात आला. जिल्‍हा वार्षिक नियोजनातून सन 2019-20 मध्‍ये ससून रुग्‍णालयाला 16 कोटी 16 लाख निधी उपलब्‍ध करुन देण्‍यात आला. यातून आयसीयू युनिट यंत्रसामुग्री, औषध खरेदी, ऑक्सिजन गॅस पाईपलाईन, वातानुकुलीत सुविधा करणे ही कामे करण्‍यात आली. जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सकांना औषधे व यंत्रसामुग्री खरेदीसाठी 4 कोटी 7 लाख रुपये तर जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांना औषधे व यंत्रसामुग्री तसेच जीवनसत्‍व विषयक औषधे खरेदी करण्‍यासाठी 7 कोटी 89 लाख रुपये उपलब्‍ध करुन देण्‍यात आले. आर्थिक वर्ष 2020-21 मध्‍ये ससून रुग्‍णालयाला विद्युत विषयक कामे व 2500 कोरोना टेस्‍ट कीट खरेदीसाठी 1 कोटी 71 लाख रुपये, जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक यांना 9 ग्रामीण रुग्‍णालयांना सेंट्रल ऑक्सिजन गॅस पाईपलाईन तसेच औषधे व यंत्रसामुग्री खरेदीसाठी 11 कोटी आणि जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांना खाजगी दवाखान्‍यांना संदर्भित केलेल्‍या रुग्‍णांच्‍या औषधोपचार खर्चाच्‍या प्रतीपूर्तीसाठी 5 कोटीचा निधी उपलब्‍ध करुन देण्‍यात आला. जिल्‍हा वार्षिक नियोजनातून सन 2019-20 मध्‍ये एकूण 28 कोटी 12 लाख आणि आर्थिक वर्ष 2020-21 मध्‍ये 17 कोटी 71 लाख असा एकूण 45 कोटी 83 लाख रुपयांचा निधी उपलब्‍ध करुन देण्‍यात आल्याची माहिती जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

सध्‍या पुणे जिल्‍ह्यात एकूण प्रतिबंधित क्षेत्रांची संख्‍या 144 इतकी आहे. पुणे महानगर पालिका 48, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका 47, पुणे ग्रामीण 42, पुणे कटक मंडळ 2, खडकी कटक मंडळ 4 आणि देहूरोड कटक मंडळ 1 अशी संख्‍या आहे. टाळेबंदी उठविल्यामुळे रुग्‍णसंख्‍येत वाढ होण्‍याचा धोका आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, खाजगी कंपनीचे कर्मचारी व इतर व्‍यक्‍तींच्‍या वाह‍तुकीमुळे संसर्गाचा धोका आहे. बाजारपेठा आणि इतर दुकाने उघडल्‍यामुळे लोकांची रस्‍त्‍यावर वर्दळ वाढणार या सर्व बाबींचा विचार करुन भविष्‍यात रुग्‍णसंख्‍येच्‍या वाढीची लाट येण्‍याची शक्‍यता गृहित धरुन 12 हजारपेक्षा जास्‍त रुग्‍णांसाठी आवश्‍यक तयारी करण्‍यात आली आहे. रुग्‍ण भरतीसाठी व संनियंत्रणासाठी विशेष सॉफ्टवेअर तयार करण्‍यात आले आहे. वयोवृध्‍द व्‍यक्‍ती, लहान बालके व इतर आजार (मधुमेह, उच्‍च रक्‍तदाब, ह्रदयरोग, मूत्रपिंड विकार, श्‍वसनाचे विकार, गर्भवती महिला इ.) असणा-या व्‍यक्‍ती यांच्‍यावर विशेष लक्ष देण्‍यात येत आहे. उच्‍च रक्‍तदाब व मधुमेह रुग्‍ण शोध व उपचारासाठी विशेष शिबीराचे आयोजन तसेच रुग्‍ण शोधण्‍यासाठी पल्‍सऑक्सिमीटरचा वापर करण्‍यात येणार आहे.

कोरोनावरील खात्रीशीर उपचार किंवा प्रतिबंधीत लसीचा शोध लागेपर्यंत आपणा सर्वांना कोरोनासोबत जगण्‍याची सवय करुन घ्‍यावी लागणार आहे. कोरोनाचा संसर्ग होणारे रुग्‍ण आणि बरे होणारे रुग्‍ण याबाबतही सकारात्‍मक विचार करुन वाटचाल करावी लागणार आहे. कोरोनाची भीती न बाळगता आवश्‍यक ती काळजी घेणे आणि शासनाच्‍या आवाहनाला प्रतिसाद देण्‍याची मानसिकता ठेवून कृती करणे या गोष्‍टी आपल्‍याला कोरोनापासून निश्चितच वाचवू शकते.

राजेंद्र सरग, जिल्‍हा माहिती अधिकारी, पुणे