कानपूर प्रतिनिधी : उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील घाटमपूर येथे दिवाळीच्या दिवशी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जादूटोणा आणि तंत्र-मंत्रासाठी एका सहा वर्षीय दलित मुलीची हत्या करण्यात आली आहे. एवढंच नाहीतर तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक ग्रामीण बृजेश श्रीवास्तव यांनी सोमवारी सांगितलं की, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अंकुल कुरील (20) आणि बीरन (31) नावाच्या व्यक्तींनी पोलिसांना माहिती दिली की, त्यांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर गळा घोटून तिची हत्या केली.
जादूटोणा करण्यासाठी मुलीची फुफ्फुसं काढली
त्यांनी सांगितलं की, हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपिंनी चिमुकलीची फुफ्फुसं काढून मुख्य आरोपी पुरुषोत्तमला दिली होती. पुरुषोत्तमला जादूटोणा करण्यासाठी मुलीच्या या अवयवांची गरज होती. श्रीवास्तव यांनी सांगितलं की, ‘पुरुषोत्तमला रविवारीच अटक करण्यात आली होती. तर त्याच्या पत्नीवरही या प्रकरणात मदत केल्याचा संशय असल्यांमुळे ताब्यात घेण्यात आलं होतं.’
पुत्रप्राप्तीसाठी जादूटोण्याची मदत
श्रीवास्तव यांनी सांगितलं की, पुरुषोत्तमने सुरुवातीला पोलिसांना भरकटवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, कसून चौकशी केल्यानंतर त्याने सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. पुरुषोत्तमने पोलीस चौकशीत सांगितल्यानुसार, त्याचं लग्न 1999 मध्ये झालं होतं. परंतु, आतापर्यंत त्याला मुलबाळ नव्हतं. आपत्य मिळवण्यासाठी त्याला जादूटोणा करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यासाठी एका लहान मुलीच्या फुफ्फुसांची गरज होती. त्यासाठी त्याने आपला भाचा अंकुल आणि त्याचा मित्र बीरन यांना शेजारच्या मुलीचं अपहरण करण्यासाठी तयार केलं होतं.