मुंबई – मुंबई महापालिकेतील नगरसेवक आमदार खासदार म्हणून निवडून जातात. नगरसेवक जेव्हा आमदार व खासदार म्हणून निवडून जातात अशावेळी त्यांनी एकाच सभागृहाचे मानधन घेणे अपेक्षित आहे. मात्र, मुंबई महापालिकेतील भाजपचे पराग शाह, समाजवादीचे रईस शेख आणि शिवसेनेचे दिलीप लांडे हे तीन आमदार नगरसेवक आणि आमदार असे दोन्ही मानधन घेत असल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली.
नगरसेवक जेव्हा आमदार व खासदार म्हणून निवडून जातात अशावेळी त्यांनी एकाच सभागृहाचे मानधन घेणे अपेक्षित आहे. मात्र, मुंबई महापालिकेतील भाजपचे पराग शाह, समाजवादीचे रईस शेख आणि शिवसेनेचे दिलीप लांडे हे तीन आमदार नगरसेवक आणि आमदार असे दोन्ही मानधन घेत असल्याची बाब उघड झाली आहे.
मुंबई महापालिकेतील जे नगरसेवक आमदार आणि खासदार म्हणून निवडून गेले आहेत अशा किती लोकांना पालिकेकडून मानधन दिले जाते, याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिकेच्या चिटणीस विभागाकडून मागवली होती. त्यावर चिटणीस विभागाने अनिल गलगली यांस कळविले की, खासदार मनोज कोटक आणि आमदार रमेश कोरगावकर मानधन घेत नाहीत. तर, आमदार रईस शेख, पराग शहा आणि दिलीप लांडे यांना दरमहा 25 हजार रुपये मानधनासाठी आणि महापालिकेच्या प्रत्येक सभेकरिता 150 रुपये भत्त्यासाठी, अशा केवळ चार सभांकरिता मानधन दिले जाते.
मुंबई महापालिकेतून आमदार म्हणून निवडून गेलेले शिवसेनेचे रमेश कोरगांवकर व भाजपचे खासदार मनोज कोटक हे आमदार आणि खासदार म्हणून मानधन घेत आहेत. त्यामुळे, ते नगरसेवकांना दिले जाणारे मानधन आणि सभेसाठी दिले जाणारे मानधन घेत नाहीत, असे पालिकेच्या चिटणीस विभागाने कळविले आहे.
जेव्हा हे नगरसेवक आमदार आणि खासदार झाले तेव्हा त्या जागेवर निवडणूक घेणे आवश्यक होते. पण कोठल्याही राजकीय पक्षाने निर्णय घेतला नाही. अशा परिस्थितीत मानधन न घेण्याची सूचना करणे आवश्यक होते, असे अनिल गलगली यांनी म्हटले आहे. दरम्यान याबाबत भाजपचे आमदार पराग शाह यांच्याशी संपर्क साधला असता मला यामधील काही माहिती नसल्याने यावर बोलण्यास नकार दिला. तर, समाजवादीचे रईस शेख व शिवसेनेचे दिलीप लांडे यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.