मोशी येथे होणाऱ्या तेविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुण बोऱ्हाडे; स्वागताध्यक्ष पदी उद्योजक संतोष बारणे

904

पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या वतीने पुढील महिन्यात देहू आणि आळंदी या दोन तीर्थक्षेत्रामधील ‘मोशी’ येथे होणाऱ्या २३व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांची, तर स्वागताध्यक्षपदी प्रसिद्ध समाजनिष्ठ उद्योजक संतोष बारणे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली.

अरुण बोऱ्हाडे यांच्या नवोदय, रानपाखरं अशी ही…, राजघाट, कार्यकर्ता, आमचे नेते : आमची प्रेरणा, वेध सामाजिक जाणिवांचा, माय माझी इंद्रायणी, चांदण्यांच्या अंगणात या साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्षपद, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे मुख्य कार्यवाह, श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्षपद भूषविले आहे.

तीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी पिंपरी येथील पेनिसिलीन कारखान्याच्या कामगार संघटनेचे नेतृत्व समर्थपणे केले. ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हा समितीचे मुख्य संघटक असून त्यांनी महापालिकेचे नगरसेवक म्हणूनही काम पाहिले आहे. संमेलनाच्या नियोजनासाठी कार्याध्यक्ष प्रकाश जवळकर, समन्वयक ज्ञानेश्वर कांबळे आणि प्रा. प्रशांत रोकडे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.