रिंकू राजगुरू, ललित प्रभाकर यांच्या ‘खिल्लार’मधून होणार बैलगाडा शर्यतीचा जल्लोष

147

– *मकरंद माने दिग्दर्शित आगामी चित्रपटाची घोषणा*

 

 

महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय वातावरणात बैलगाडा शर्यतींचे महत्त्व मोठे आहे. आता याच बैलगाडा शर्यतींचा जल्लोष चित्रपटात उडताना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने यांच्या खिल्लार या आगामी चित्रपटात बैलगाडा शर्यत आणि त्याभोवतीचे वातावरण दाखवले जाणार असून, रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

न्युक्लिअर अॅरो पिक्चर्स या निर्मिती संस्थेतर्फे ‘खिल्लार’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. नगरसेवक संतोष भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव मावळ इथं झालेल्या पुणे जिल्हा केसरी भव्य २०-२० बैलगाडा शर्यतीवेळी ‘खिल्लार’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली. तसंच चित्रपटाचं पहिलं पोस्टर लाँच करण्यात आलं. येत्या काही दिवसांत चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार आहे. चित्रपटाची कथा, कलाकार आदी तपशील टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येईल.

मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वाचा दिग्दर्शक म्हणून स्थान निर्माण केलेल्या मकरंद मानेनं दिग्दर्शित केलेला रिंगण हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरला होता. त्यानंतर मकरंदनं यंग्राड, कागर, सोयरीक, पोरगं मजेतंय असे उत्तमोत्तम चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. मूळचा पश्चिम महाराष्ट्रातला असल्यानं मकरंदनं बैलगाडा शर्यतींचं वातावरण अतिशय जवळून पाहिलं आहे. त्यामुळेच आता हा विषय तो ‘खिल्लार’ चित्रपटातून मांडत आहे. रिंकू राजगुरूनं कागर या चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. त्यामुळे मकरंद आणि रिंकू पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. तर मकरंद आणि रिंकू यांच्याबरोबर ललित प्रभाकर पहिल्यांदाच काम करत आहे.

चित्रपटाविषयी मकरंद माने म्हणाला, की बैलगाडा शर्यतीचा विषयच अगदी जिव्हाळाचा आहे. महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल रांगडा खेळ पडद्यावर रंगवताना ‘खिल्लार’मधून मैदान जोरदार रंगणार माझी खात्री आहे.